दिल्ली पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. तब्बल 27 वर्षांपासून कार चोरी करणाऱ्या एका अट्टल चोराचा अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1995 पासून देशाच्या विविध भागातून सुमारे 5000 गाड्या चोरणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार अनिल चौहान याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कार चोरी व्यतिरिक्त शस्त्रास्त्र कायदा आणि तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
दिल्ली पोलिसांनी आरोपी अनिल चौहानला अवैध देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे आणि चोरीच्या मोटारसायकलसह अटक केली आहे. त्याचवेळी त्याच्याकडून तपासादरम्यान आणखी पाच देशी बनावटीची पिस्तुले, पाच काडतुसे आणि चोरीची कारही जप्त करण्यात आली आहे.
अनिल चौहान हा मूळचा आसाममधील तेजपूरचा रहिवासी असून दिल्लीच्या खानपूर एक्स्टेंशनमध्ये अनेक दिवसांपासून राहत होता. पोलिसांनी सांगितलं की, 52 वर्षीय अनिलची दिल्ली, मुंबई आणि उत्तर-पूर्व भागात मालमत्ता आहे. याआधीही पोलिसांनी अनिलला अनेकदा अटक केली असून तो बराच काळ तुरुंगातही होता. अनिलला तीन पत्नी आणि सात मुलं आहेत.
आसाममध्ये गेंड्याच्या शिंगाची तस्करी
दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, अनिल चौहान हा आसाममध्ये कंत्राटदार होता, पण त्याचवेळी तो आसाममध्ये गेंड्याच्या शिंगाची तस्करी करत असे. त्याने बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा पुरवठाही केला असून एकूण 181 गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. पोलिसांनी सांगितलं की, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल चौहानच्या घरावर छापा टाकला आणि त्याची सर्व मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव केला.
5 हजार गाड्या चोरल्याचा आरोप
1990 मध्ये अनिल चौहान दिल्लीत आला आणि खानपूर परिसरात राहू लागला. येथे तो आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ऑटोरिक्षा चालवत असे, मात्र काही वर्षांनी तो हळूहळू पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या जगात आला. अनिलवर आसाम, दिल्ली, महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांतून सुमारे 5 हजार गाड्या चोरल्याचा आरोप आहे.
टॅक्सी चालकांची केली हत्या
अनिल चौहानने काही टॅक्सी चालकांची हत्याही केली असून त्याला याआधी अटकही करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी सांगितलं की, 2015 मध्ये आसाम पोलिसांनी अनिलसह काँग्रेस आमदाराला अटक केली होती आणि पाच वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर 2020 मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली होती.
'देशातील सर्वात मोठा कार चोर'
अनिल चौहानचे वर्णन 'देशातील सर्वात मोठा कार चोर' असं केलं जात आहे. पोलीस उपायुक्त (मध्य) श्वेता चौहान यांनी सांगितलं की, अलीकडच्या काळात दिल्लीत बेकायदेशीर शस्त्र पुरवठा करणाऱ्यांच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे. यानंतर, मध्य जिल्ह्याच्या विशेष कर्मचार्यांना याची चौकशी करण्याचे काम सोपविण्यात आले आणि मध्य दिल्लीतील डीबीजी रोड पोलीस स्टेशनच्या परिसरात अवैध शस्त्र पुरवठादार आणि कार चोर अनिल चौहान उपस्थित असल्याचं आढळून आलं. यानंतर पोलिसांनी पूर्ण तयारीनिशी छापा टाकून 23 ऑगस्ट रोजी त्याला अटक केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.