नवी दिल्ली - दिल्लीमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. शालिमार बाग परिसरात एका 84 वर्षांच्या महिलेची तिच्याच नातवानं सर्जिकल ब्लेडने गळा चिरून हत्या केली आहे. या हत्येनंतर अल्पवयीन मुलाने आपल्या मित्रांना व्हिडीओ कॉल करून आजीचा मृतदेह दाखविला. नातवाने आपल्या आजीकडे पैसे मागितले होते. परंतु आजीने पैसे देण्यासाठी नकार दिल्यामुळे त्याने तिचा जीव घेतला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जुलै रोजी दिल्लीतील शालिमार बाग भागात एका 84 वर्षांच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.
पोलिसांना चौकशीदरम्यान समजलं की, मृत वृद्ध महिलेने अलीकडेच आपली मालमत्ता विकली असून ती शालिमार बाग परिसरातील घरात एकटीच राहत होती. पोलिसांनी महिलेच्या घराभोवती असलेल्या सीसीटीव्ही तपासले असता यामध्ये पांढर्या टॉवेलने चेहरा झाकलेल्या एका संशयित व्यक्तीने रात्री तिच्या घरात प्रवेश केल्याचं आढळलं. यानंतर, तो व्यक्ती रात्री 11:20 वाजता बाहेर आला. यानंतर, पुन्हा रात्री 12:20 वाजता घरात प्रवेश करताना दिसला आणि काही काळानंतर पुन्हा बाहेर पडला.
पोलिसांनी सीसीटीसीमध्ये संशयित व्यक्तीला कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे बारकाईने पाहिले. जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी संशयिताची ओळख उघडकीस आणली, संशयित हा इतर कोणी नसून तो वृद्ध महिलेचा नातू होता. पोलिसांनी मृत महिलेच्या नातवाला ताब्यात घेतलं. मुलाची चौकशी केली तेव्हा त्याने धक्कादायक खुलासा केला. त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याचे शाळेत त्याचे चार मित्र बनले होते. अल्पवयीन मुलाने त्या मित्रांकडून पैसे उसणे घेतले होते, जे त्यानं परत केले नव्हते.
अल्पवयीन मुलाने त्या चौघांना सांगितले की, माझ्याकडे पैसे नाहीत आणि आजीने अलीकडेच प्रॉपर्टी विकली आहे. त्यामुळं तिच्याकडे खूप पैसे आहेत. परंतु माझी आजी एकटी राहते. तिला पैसे मागू. ती पैसे देऊ शकते. जर तिनं पैसे दिले नाहीत, तर तिला ठार करून पैसे आणता येतील. त्यानंतर या सर्वांनी एक प्लॅन बनवला. प्लॅननुसार हा अल्पवयीन मुलगा आजीच्या घरी पोहोचला आणि तिच्याकडे पैसे मागितले. जेव्हा आजीने नकार दिला तेव्हा त्या अल्पवयीन मुलाने आजीला ढकलले. यानंतर, सर्जिकल ब्लेडने गळा चिरून तिला ठार मारले. हत्येनंतर मित्रांना व्हिडीओ कॉलवर मृतदेह दाखवला आणि हत्या केल्याचं सांगितलं. यानंतर मित्रांना कॉल करून एके ठिकाणी बोलवलं आणि आजीच्या घरातून लुटून आणलेले सुमारे 1 लाख पन्नास हजार रुपये देऊन कर्जाची रक्कम परत केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.