नवी दिल्ली - सोशल मीडियावरून फसवणुकीच्या तसेच हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. बारावी शिकलेल्या एका तरुणाने दिल्लीतील प्रसिद्ध डॉक्टरला आपल्या जाळ्यात ओढलं अन् तब्बल 2 कोटींना लुटल्याची घटना घडली आहे. हैराण करणारी बाब म्हणजे पैशासाठी 'तो' झाला 'ती' झाला म्हणजे तरुणी असल्याचं सांगून डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये फसवलं आणि नंतर 2 कोटींना गंडवलं आहे. 44 वर्षीय डॉक्टरला आपली फसवणूक झाल्याचं समजताच त्याने पोलिसांत धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. त्यातून धक्कादाक माहिती समोर आली. डॉक्टर ज्या व्यक्तीशी तरुणी म्हणून बोलत होते, ती तरुणी नसून तरुण होता. तो महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातला होता. त्याने आपलं नाव संदेश मानकर असल्याचं सांगितलं आहे. बारावीपर्यंत शिकलेल्या संदेशकडून पोलिसांनी 1.97 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुणी असल्याचं सांगून एक खोटं प्रोफाईल तयार केलं होतं. त्याच्याच जाळ्यात दिल्लीतील एक 44 वर्षीय डॉक्टर फसले.
बारावी पास तरुणाने डॉक्टरला जाळ्यात ओढलं
काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर डॉक्टर संदेश मानकरच्या संपर्कात आले. तेव्हा आरोपीने तरुणी असल्याचं भासवून त्यांची फसवणूक केली. आपण एका श्रीमंत कुटुंबातील तरुणी असून, दुबईत आपला एक मोठा व्यवसायही आहे असं सांगितलं त्या दोघांमध्ये अनेक दिवस संवाद होत राहिला. त्या तरुणीचं प्रोफाईल इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडियावरही होतं. त्यामुळे डॉक्टरांचा तिच्यावर विश्वास बसला. सोशल मीडियावर फ्रेंड असलेल्या तरुणीने एके दिवशी डॉक्टरला तिच्या बहिणीचं अपहरण झालं आहे असं सांगितलं. अपहरणकर्त्यांनी तिला सोडण्यासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे अशीही माहिती दिली.
तब्बल 2 कोटींना लुटलं; अशी झाली पोलखोल
तरुणीला मदत करण्यासाठी डॉक्टरने यवतमाळला जाऊन सांगितलेल्या पत्त्यावर एका व्यक्तीला पैसे दिले. त्यानंतर त्या तरुणीने डॉक्टरला धन्यवाद देणारा मेसेज पाठवला आणि आपली बहीण सुरक्षितरीत्या घरी आल्याचंही सांगितलं. यासोबतच एक बँक खाते क्रमांक दिला आणि तिथे 7 लाख 20 हजार रुपये भरण्यास सांगितलं. डॉक्टरने ते देखील पैसे दिले. जवळपास दोन कोटी मिळाल्यानंतर त्या तरुणीने आपला फोन नंबर बंद केला आणि सर्व सोशल मीडिया अकाउंट्सही डिलीट करून टाकली. काही दिवस तिचा काहीच पत्ता लागला नाही, तेव्हा डॉक्टरला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि पोलीस तपासात आरोपी तरुणी नसून तरूण असल्याचं समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईने याबाबतचे वृत्त दिले आहे.