मुंबई : चेंबूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहिलेल्या शालिनी शर्मा यांच्याविरोधात त्याच पोलीस ठाण्यात पदाचा गैरवापर करत, खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीच्या खोट्या गुह्यांत अडकवून भावाच्या सुटकेसाठी ५० लाखांची मागणी केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानुसार, पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्यासह निलंबित पोलीस अधिकारी अनिल ऊर्फ भानुदास जाधव आणि राजू सोनटक्के यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेंबूर नाका परिसरात तक्रारदार कुरेशी कुटुंबीय राहतात. इव्हेन्ट मॅनेजमेंटचे काम करणाऱ्या सैदा कुरेशी (३२) यांच्या तक्रारीनुसार, भाऊ मोहम्मद मेहबूब ऊर्फ वसीमला फसवणुकीच्या खोट्या गुह्यांत अडकवून १९ नोव्हेबर २०२० रोजी अटक केली. त्याचा कार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याला तळोजा कार्यालयात ठेवून कुटुंबीयाविरोधात ५०९ चा गुन्हा नोंदवत, त्यामध्ये भावाची पुन्हा कोठडी घेतली. १८ फेब्रुवारी २०२१ ते २५ फेब्रुवारीपर्यंत कोठडीत असताना शर्मा कोरोनाबाधित असतानाही सुटीदरम्यान पोलीस ठाण्यात आल्या. भावाला लॉकअपमधून काढून त्यांच्या कक्षात आणले. यादरम्यान जाधव व शर्मा आणि खासगी व्यक्ती राजू सोनटक्केही होता. सोनटक्केने व्हॉट्सॲप कॉल करून वसीमसोबत बोलणे करून दिले. त्यानंतर पैशांची मागणी सुरू झाली. भावाच्या जामिनासाठी ५० लाखांची मागणी केली, पैसे नाही दिल्यास दुसऱ्या गुह्यांत अटक करण्याचा इशारा दिल्याचे म्हटले आहे. त्यांनी गुन्हे शाखे कडे तक्रार अर्ज दिला. त्यानुसार गुरुवारी रात्री शर्मासह जाधव, सोनटक्के विरोधात खंडणी, धमकावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल नंबर बंद होता.
मालमत्तेचा वाद... पोलिसांकडून सेटलमेंटचा घाटnसैदाच्या आरोपानुसार, त्यांचे दादा अब्दुल हाफिज कुरेशी यांचे चेंबूर परिसरात ५ रो हाउस, ११ दुकाने आणि एक मोठा मोकळा प्लॉट आहे. याच मालमत्तेतील ४ दुकाने काका अस्लम कुरेशी यांनी परस्पर विकली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. nकाकांची निलंबित पोलीस अधिकारी अनिल जाधव सोबत चांगले संबंध आहेत. जाधव विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये बलात्काराचा गुन्हा नोंद आहे. nपोलीस ठाण्यात येऊन तो सेटलमेंटसाठी कुटुंबीयांना त्रास द्यायचा. दुसरीकडे जाधवने सुटकेसाठी ५० लाख द्या, नाही तर ५० लाख घेऊन मालमत्ता आम्हाला विका, यासाठी दबाव आणल्याचे म्हटले आहे. मालमत्तेची किंमत १५ कोटी आहे.
२५ लाख उकळलेगुन्हा दाखल करण्यापूर्वी शर्मा यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना २५ लाख उकळले आहेत. तसेच, वेळोवेळी कुटुंबीयाना मानसिक त्रास दिला आहे. अखेर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे कायदा आमच्याही बाजूने असल्याचे दिसले. त्यामुळे गुन्हे शाखेने अटकेची कारवाई करावी, असे तक्रारदार यांचे भाऊ वसीम कुरेशी यांनी सांगितले.
कोण आहेत शालिनी शर्मा? उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शालिनी यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित केले होते. तर नागपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमणुकीस असताना शाहीन बाग आंदोलनप्रकरणी आमदार अबू आझमी यांच्याशी खटका उडाल्यावर त्यांची चेंबूर पोलीस ठाण्यात बदली केली. आता तेथून त्यांची दुसरीकडे बदली करण्यात आली आहे.
तपास सुरूगुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा देत तपास सुरू असून, कुणाला अटक केली नसल्याचे गुन्हे शाखेच्या कक्ष ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी सांगितले.