नागरिकांच्या मदतीसाठी किंवा गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी हेल्पलाईन सुरु केली आहे. परंतू पोलिसांना अनेकदा या १०० नंबरवर भंकस करणारे, वेळ वाया घालविणारे फोन येतात. तरीही पोलीस तिथे जातात, कारण कोण जाणे एखादा संकटात असेल तर... अशा समाजकंटकांमुळे गरजू व्यक्ती मदतीपासून वंचित रहायला नको. पण अशा समाजकंटकांनाही पोलीस चांगलाच प्रसाद देतात बरं का....
ही घटना आहे तेलंगानाची. रात्रीचे २.३० वाजले होते. विकाराबाद पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या फोनची रिंग वाजली. पोलिसांनी फोन उचलला, समोरून मधु नावाच्या तरुणाचा आवाज होता. ''मला मदतीची गरज आहे.'', यावर पोलिसांनी काय झालेय असे विचारले तर त्याने फोनवर सांगू शकत नाही, तातडीने घरी या, असे उत्तर दिले. मधुने सांगितलेल्या दौलताबादच्या पत्त्यावर पोलिसांनी गस्तीवरील पोलिसांना पाठविले. तो संकटात असेल, असे वाटून पोलीस त्याच्या दारावर पोहोचले.
मधुने तिथे गेलेल्या पोलिसांना सांगितले की, दौलताबादमध्ये सर्व दारुची दुकाने बंद आहेत. यामुळे मला दोन थंड बिअरच्या बॉटल घेऊन या. यावर पोलिसांची सटकली, मधुची मागणी ऐकून पोलीस हैराण झाले. घरातच पोलिसांनी मधुला मार मार मारले आणि पोलिस ठाण्यात नेऊन त्याच्यावर गुन्हाही दाखल केला. डेक्कन क्रॉनिकलने याबाबतचे वृत्त दिले आहे. यानुसार मधु तेव्हा नशेत होता.
१०० नंबरवर असा प्रकार पहिलाच नाही....पोलिसांना १०० नंबरवर छोट्या छोट्या कारणावरून फोन येत असतात. एकाने तर आपली पत्नी मटन करी बनवत नसल्याची तक्रार केली होती. तो देखील दारुच्या नशेत होता. मध्य प्रदेशमध्ये एका महिलेने आपला बॉयफ्रेंड बोलत नसल्याची तक्रार केली होती. त्या दोघांचे भांडण झाले होते. यामुळे तिने पोलिसांकडे मदत मागितली होती.