नवी दिल्ली - जयपुरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका महिला ड्रग इन्स्पेक्टरला पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. संबंधित महिला इन्स्पेक्टरला अटक होताच तिने लाचखोरी करण्यामागचं स्पष्टीकरण दिलं आहे. "हा पैसा माझ्या एकटीसाठी घेतला नसून वरपर्यंत हे पैसे द्यावे लागतात. असं न केल्यास आपली बिकानेरला बदली केली जाऊ शकते" असंही म्हटलं आहे. महिला इन्स्पेक्टरच्या धक्कादायक दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. सिंधू कुमारी असं रंगेहात अटक केलेल्या आरोपी महिला ड्रग इन्स्पेक्टरचं नाव आहे. जयपूरमधील 500 मेडिकल स्टोअर्सची तपासणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधू कुमारी संबंधित 500 मेडिकल दुकानातून दरमहा पाच हजार रुपये वसुली करत होत्या. दहा दिवसांपूर्वी एका मेडिकल स्टोअरवाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. या प्रकरणी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सलग सात दिवस पाठपुरावा केल्यानंतर, आरोपी ड्रग्स इन्स्पेक्टर सिंधू कुमारीला पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार अधिकाऱ्यांनी लाचखोरीचे पैसे घेऊन जाण्यासाठी सिंधू कुमारी यांना एका हॉटेलमध्ये बोलावलं. याठिकाणी पैसे स्वीकारताना पोलिसांनी तिला रंगेहात पकडलं आहे.
सिंधू कुमारी या जयपूर येथे कर्तव्यावर होत्या. धक्कादायक बाब म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर सिंधू कुमारी लाच घेत असताना, वैद्यकीय विभागात एक मिटींग सुरू होती. संबंधित मिटींगसाठी सिंधू कुमारी यांना बोलावण्यात आलं होतं. पण त्यांनी मिटींगला न जाता लाच घेण्यासाठी हॉटेलमध्ये आल्या होत्या. जयपुरमधील सर्वात मोठी वैद्यकीय व्यवसायाची बाजारपेठ असणाऱ्या सेठी कॉलनीची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. याठिकाणी एकूण 500 मेडिकल स्टोअर्स आहेत. त्या ड्रग्स इन्स्पेक्टर असूनही त्यांना वाहन आणि चालक अशा सुविधा देण्यात आल्या होत्या.
कोरोना काळात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचं संकट निर्माण झालं होतं. तेव्हा औषध विभागाने रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा करण्याची संपूर्ण जबाबदारी ड्रग इन्स्पेक्टर सिंधू कुमारी यांच्याकडे दिली होती. पण लाचखोरी प्रकरणात सिंधू कुमारी यांना रंगेहात पकडल्यानं औषध विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार असल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.