रेवाडी - हरियाणामधील रेवाडी जिल्ह्यामध्ये एका रोडवेज बसने रस्त्यावर धुमाकूळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे दोन सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये चालकाला बसवर नियंत्रण मिळवता येत नसल्याचे दिसत आहे. तरीही तो ही अनियंत्रित बस रस्त्यावरून नेताना दिसत आहे. या बसने बोलनी रोडवरील विजेचे दोन पोल तोडले. अखेर तिसऱ्या पोलला धक्का देऊन ही बस थांबली.
सुदैवाने धुलिवंदनाचा दिवस असल्याने रस्ता रिकामी होता. जे कुणी किरकोळ लोक रस्त्यावरून ये जा करत होते, ते जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पळाले. अखेर एका विजेच्या खांबाला टक्कर देऊन ही बस थांबली. अन्यथा या बसने अजून नुकसान केले असते.
धुलिवंदनादिवशी बस स्टँडमध्ये बसची साफसफाई करण्यात येत होती. त्याचवेळी एका मद्यधुंद सफाई कर्मचाऱ्याने दुपारी अडीचच्या सुमारास एक बस सुरू केली. त्यानंतर त्याने ही बस मुख्य रस्त्यावर आणली. मात्र या बसवर नियंत्रण मिळवणे त्याला शक्य होईना. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्येही कैद झाला आहे. त्याक एका सफाई कर्मचाऱ्याच्या बेफिकीरीमुळे लोकांचे जीव धोक्यात आलेले दिसत आहेत.
दरम्यान, या प्रकारानंतर एक सफाई कर्मचारी परिवहनची बस सुरू करून कशी काय चालवायला घेऊन गेला. तसेच या बसचा चालक कोण होता आणि त्याने सफाई कर्मचाऱ्याला चावी का दिली. तसेच कुठल्याही परवानगीविना हा सफाई कर्मचारी ही बस बसस्टँडच्या आवाराबाहेर कशी काय घेऊन गेला, असे प्रश्न निर्माण होत आहेत.