तिरुवनंतपुरम - केरळमध्ये कौटुंबिक नात्यांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका वृद्ध व्यक्तीने त्याच्या मुलासह कुटुंबातील तीन सदस्यांना घरात कथितपणे जिवंत जाळले. केरळमधील इडुक्की परिसरात हा भयावह प्रकार घडला. मालमत्तेच्या वादातून आरोपीने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी सकाळी घडली. त्यानंतर पोलिसांनी ७९ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितलं की, या घटनेमध्ये घरात झोपलेला मुलगा, सून आणि दोन नातींचा जळून मृत्यू झाला. ७९ वर्षीय हामिदने आधी घराच्या दरवाजाला कुलूप लावून त्यांना आत कोंडले. नंतर खिडकीमधून घराच्या आत पेट्रोलने भरलेली बाटली टाकली व घराला आग लावली.
यादरम्यान, कुटुंबातील एका व्यक्तीने आग पाहून मदतीसाठी आक्रोश केला. मात्र आग भीषण असल्याने शेजारी त्यांना वाचवू शकले नाहीत. दरम्यान, या भीषण आगीत संपूर्ण घर खाक झाले आणि घरातील चौघे जण जळून मृत्युमुखी पडले. दरम्यान, एका शेजाऱ्याने हामीदला बाटली फेकताना पाहिले होते.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही एक सुनियोजित हत्या होती. कारण आरोपी हामिदने किमान पाच बाटल्यांमध्ये पेट्रोल गोळा केले होते. तसेच आग शमवण्याचा प्रयत्न करता येऊ नये म्हणून घरातील पाण्याची टाकीही रिकामी केली होती. तसेच शेजारच्या विहिरीतूनही पाणी आणता येऊ नये म्हणून बादली आणि दोरीही काढून टाकली होती.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपीने मुलासोबत सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादातून हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडील आणि छोट्या मुलगीचे मृतदेह एकमेकांना बिलगलेल्या अवस्थेत होते.