चंडीगड - खाणमाफियांना रोखण्यासाठी गेलेल्या डीएसपी सुरेंद्र बिश्नोई यांची डंपरखाली चिरडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हरयाणातील नूंह इथे घडला होता. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, सुरेंद्र बिश्नोई यांची हत्या करणाऱ्या आरोपींना पकडण्यात आले आहे. अटक करण्यापूर्वी आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यात एका आरोपीला गोळी लागली आहे.
डीएसपी सुरेंद्र बिश्नोई हे नूंह जिल्ह्यात अवैध खाणकाम रोखण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान, त्यांना डंपरखाली चिरडून मारण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार सीआयए इंचार्ज सुरेंद्र सिद्धू यांच्या नेतृत्वाखालील पथक आणि आरोपींमध्ये चकमक झाली. आरोपींना पकडण्यासाठी केलेल्या कारवाईदरम्यान ही चकमक झाली.
डीएसपी सुरेंद्र सिंह बिश्नोई यांना गावाशेजारील अरवली टेकडीवर बेकायदेशीर खाण सुरू असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर ते मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या टीमसह पोहोचले. पोलीस पथकाला पाहताच डंबर चालक व खाणकामातील इतर लोक डंपर घेऊन पळू लागले. डीएसपी गाडी थांबवण्यासाठी पुढे आले असता डंपर चालकाने त्यांच्यांवर डंपर चढवला. भरलेल्या डंबरच्या टायरखाली आल्याने डीएसपींचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर खाण माफिया घटनास्थळावरुन पळून गेले होते. घटनेची माहिती मिळताच एसपी नूह, एसडीएम आणि तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून गाव आणि अरवली डोंगर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आज दुपारी आरोपींचा ठावठिकाणा समजताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी पोलीस गेले असता चकमक उडाली. त्यानंतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.