डोंबिवली - गॅरेज काम करताना मिळालेल्या अनुभवातून मॅकेनिकने अधिक पैसा मिळण्यासाठी बाईकचोरीचा मार्ग अवलंबिल्याचे पोलिस कारवाईत समोर आले आहे. शाहरूख मोहम्मद अली शेख या मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या आणि गॅरेजमध्ये फिटर म्हणून काम करणा-याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने चोरी केलेल्या एकुण 5 लाख रूपयांच्या 13 बाईक पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
फिटर म्हणून गॅरेजमध्ये काम करणा-या शाहरूखला बाइकचे लॉक कसे तोडायचे, वायर कशी कापायची याचा अनुभव मिळाला होता. गॅरजेमध्ये काम करून फारसे पैसे मिळत नसल्याने त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने गॅरेजमधल्या अनुभवाचा वापर बाईक चोरीसाठी करायचा आणि त्या विकून अधिक पैसे कमाविण्याचा बेत आखला आणि तो तडीसही नेला. त्याने मानपाडा, नारपोली, चितळसर, डायघर, नारपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बाईक चोरी केल्या आहेत. दरम्यान मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीवरून वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल भिसे यांचे पथक गुन्हयाचा तपास करीत होते. दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीवरून शाहरूखला अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी करता त्याने बाईक चोरी केल्याची कबुली दिली. त्याचबरोबर चोरी केलेल्या बाईक मुंब्रा येथील सिया कब्रस्थानचे बाहेर ठेवल्या असल्याची माहीती दिली. जसे ग्राहक येतील त्याप्रमाणो बाईक विक्री करण्याची योजना शाहरूखने केली होती अशीही माहीती तपासात समोर आल्याची माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त जे डी मोरे यांनी दिली.
कामधंदा नसल्याने रिक्षाची चोरीरिक्षा चोरीच्या गुन्हयात सिध्देश सुनिल मांढरे याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मानपाडा हद्दीत झालेल्या एका चोरीच्या गुन्हयात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. लॉकडाऊमध्ये काम बंद पडल्याने मांढरे याने चोरीचा मार्ग अवलंबला. त्याच्याकडून चोरी केलेली 70 हजार रूपये किमतीची रिक्षा जप्त करण्यात आली आहे.