ढाका - पोलीस सुतावरून स्वर्ग गाठतात असं म्हटलं जातं. या म्हणीचा प्रत्यय एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हत्याकांडाच्या तपासामधून आला आहे. पोलिसांनी प्लॅस्टिकच्या दोरीवरून माग काढत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बांगलादेशमधील अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीलाच अटक केली आहे. त्याशिवाय या हत्याकांडामध्ये पतीचा एक मित्रही सहभागी होता.
बांगलादेशमधील न्यूज वेबसाईट द डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री रामया इस्लाम शिमू ही काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. त्यादरम्यान पोलिसांना तिचा मृतदेह ढाकापासून काही अंतरावर असलेल्या हजरतपूर ब्रिजजवळ केरानीगंज परिसरात सापडला होता. त्यानंतर स्थानिकांनी या प्रकरणाची माहिती केरानीगंज मॉडेल पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानंतर या अभिनेत्रीचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टेमसाठी पाठवला.
दरम्यान, काही वृत्तांनुसार ढाका पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, रायमा इस्लामचा पती आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या मित्राला अटक केली आहे. ढाका येथील जिल्हा पोलीस सुपरिटेंडेंट मारुफ हुसेन यांनी सांगतले की, हत्येचं कारण हे कौटुंबिक वाद हे आहे. या प्रकरणी त्यांनी रायमाचा पती आणि त्याच्या मित्राची चौकशी केली. त्यानंतर जे पुरावे मिळाले त्या आधारावर या अभिनेत्रीच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
तर पोलीस न्यूज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण पुरावा एक प्लॅस्टिकची दोरी ठरली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस रायमाच्या घरी पोहोचले होते. तिथे रायमाची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी दोन गोण्यांमध्ये मृतदेह भरून त्याची विल्हेवाट लावली होती. जेव्हा पोलीस या अभिनेत्रीच्या घरी पोहोचले तेव्हा या दोरीचे एक बंडल तिच्या पतीच्या गाडीजवळच सापडले होते.