नवी दिल्ली - रेनबेक्सी कंपनीचे माजी प्रवर्तक मलविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांना जामीन मिळवून देण्याच्या आणि तुरुंगामध्ये सुरक्षा पुरवण्याच्या बहाण्याने त्यांच्या पत्नींना एका दलालाने तब्बल २०४ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. (Crime News) याबाबतची तक्रार या उद्योगपतींच्या पत्नींनी पोलिसांमध्ये केली आहे. (Famous industrialists Singh brothers wives cheated RS 204 crore for bail)
याप्रकरणी आधीच एक गुन्हा नोंद झाला होता. आता दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजून एक गुन्हा दाखल करवून घेतला आहे. याबाबत रेनबेक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग यांची पत्नी अदिती सिंग हिने आधीच तक्रार दिलेली होती. आता दुसरे प्रमोटर मलविंदर सिंग यांची पत्नी जपना सिंग हिनेसुद्धा पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.
रेनबेक्सीचे माजी प्रमोटर असलेले सिंग ब्रदर्स ऑक्टोबर २०१९ पासूनच तुरुंगात आहेत. या दोघांवर रेलिगेयर फिनवेस्ट आणि या कंपनीची पेरेंट्स कंपनी असलेल्या रेलिगेयर एंटरप्राइजकडून २ हजार ३९७ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे.
पहिल्या प्रकरणामध्ये आरोपी सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाहोता. आता दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रोहिणी जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरविरोधात फसवणूक, खंडणी आणि गुन्हेगारी कारस्थान असा अजून एक गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखा फसवणूक आणि खंडणीप्रकरणी सुकेश चंद्रशेखर सिंह याची चौकशी करत आहे.
रेनबेक्सीचे माजी प्रवर्तक मलविंदर सिंग यांच्या पत्नीने तक्रारीत सांगितले की, तिच्याकडून जामिनासाठी चार कोटी रुपये उकळण्यात आले. तत्पूर्वी दाखल एफआयआरमध्ये शिविंदर सिंग यांच्या पत्नीने जामीनासाठी २०० कोटी रुपये घेतल्याची तक्रार दाखल केली होती.