नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान झारखंडमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. जन्मदाताच हैवान झाला असून त्याने आपल्या 2 दिवसांच्या लेकीला विषारी इंजेक्शन दिल्य़ाची भयंकर घटना घडली. पलामूमध्ये वडिलांनीच आपल्या नवजात बाळाची हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली असून पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी आरोपी पित्याला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चौनपूर पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका गावात राहणाऱ्या सीता चौधरी हिने सोना नर्सिंग होममध्ये 3 एप्रिल रोजी एका बाळाला जन्म दिला. जन्मानंतर नवजात बाळाला इंजेक्शन आणि काही औषधांची गरज होती. मुलीचे वडील अरूण चौधरी यांना नर्सिंग होममधील कर्मचाऱ्यांने औषधांची चिठ्ठी दिली. पण त्याने रुग्णालयातून औषधं आणि इंजेक्शन न घेता. बाहेरून एक इंजेक्शन आणलं.
अरूणने स्वत:च मुलीला ते इंजेक्शन दिलं. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला तसं करण्यास मनाई केली होती. पण त्याने कोणाचच काही ऐकून घेतलं नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूणने मुलीला इंजेक्शन दिल्यानंतर तिची तब्येत ही आणखी बिघडली. प्रकृती जास्त गंभीर झाल्यानंतर मुलीला नर्सिंग होममधून दुसऱ्या एका रुग्णालयात रेफर करण्यात आले. पण रस्त्यातच मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने पतीवरच गंभीर आरोप लावले आहेत.
मी आई व्हावं हे माझ्या पतीला कधीच नको होतं. याआधी देखील दोन वेळा त्याने जबरदस्तीने गर्भपात करायला भाग पाडलं. तसेच काही दिवसांपूर्वी त्याने जेवणात विष टाकून मला मारण्याचा देखील प्रयत्न केला. यामध्ये पतीसही सासरे लालजी चौधरी, सासू पानपती देवी आणि दीर अजित चौधरी यांचा देखील समावेश आहे असं पत्नीने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.