- राम शिनगारेऔरंगाबाद : बाप खुनाच्या घटनेत हर्सुल कारागृहात असतानाच त्याची दोन मुले शिवाजीनगर परिसरात घरफोड्या करीत असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाजीनगरातील देवगिरी हिल्स येथील एका घरात चोरी केल्याच्या प्रकारणात गुन्हे शाखेच्या पथकाने दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच चोरीसाठी वापरलेली चोरीची दुचाकीही जाळून टाकल्याचे सांगितले. विधिसंघर्षग्रस्तांकडून २ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
फिर्यादी मनोज पहाडे हे कोजागरी पोर्णिंमेसाठी औंढा नागनाथ येथे गेले होते. त्याच रात्री १६ वर्षांच्या अल्पवयीन सावत्र भावांनी त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यांच्या घरातुन २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. गुन्हे शाखेेचे उपनिरीक्षक अजित दगडखैर यांच्या पथकाने चोरीच्या घटनेतील आरोपी सध्या भारतनगर व आनंदनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने परिसरातुन माहिती काढली असता दोन सावत्र भावांनी चोरी केल्याचे समोर आले. त्या सावत्र भावांच्या घरी पथकाने जात चौकशी केली. तेव्हा सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मात्र, काही वेळाने चोरीची कबुली दिली. या चाेरट्यांकडून २ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या चोरट्यांनी चोरीसाठी वापरलेली दुचाकीही गजानननगरख गारखेडा परिसरातुन चोरली होती. ही दुचाकी त्यानी पुंडलिकनगर भागातील मळ्यामध्ये नेऊन जाळल्याचेही चौकशी स्पष्ट झाले. ही कामगिरी निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अजित दगडखैर, सहायक फाैजदार रमाकांत पटारे, नाईक संदीप तायडे, संजय नंद, सुनील बेलकर, संदीप राशिनकर, अजय दहिवाळ, विजय घुगे, धनंजय सानप आणि गिता ढाकणे यांच्या पथकाने केले.
३१ लाखांच्या घरफोडीतही सहभागी
गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेल्या दोन सावत्र भावांपैकी एकाने शिवाजीनगर भागातच ३१ लाख रुपयांची घरफोडी केली होती. त्यातही त्यास पकडण्यात आले होते. त्याच्या विरोधात विविध ठाण्यात पाच पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहे. दुसऱ्या भावाने हा पहिलाच गुन्हा केल्याचेही चौकशीत समोर आले.