सातारा - आजपर्यंत आपण सख्या भावांची भांडणे मालमत्ता व जमिनीवरून झाल्याचे पाहात आलो आहोत. मात्र, दोन मांजरे संख्या भावांमध्ये वादाचे कारण ठरू शकतात, हे पहिल्यांदाच पहायला मिळतंय. मांजराने दिलेल्या त्रासामुळे दोन सख्या भावांच्या कुटुंबात मिठाचा खडा पडला असून, धाकट्या भावाच्या कुटुंबाला मदल्या भावाने मारहाण केल्याचा प्रकार तळीये, ता. कोरेगाव येथे घडलाय. ज्या मांजरांनी ही भांडणे लावली. ती मांजरे मात्र, नामानिरीळी राहिली. परंतु मारहाण केल्यामुळे तिघांवर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तळीये, ता. कोरेगाव येथील अहमद शेख (वय ४३) हे वडाप विक्रेते आहेत. घराशेजारीच त्यांच्या भावाचे घर आहे. शेख यांच्या घरावरील पत्रा खराब असल्यामुळे त्यांनी पत्र्यावर प्लास्टिकचा कागद अंतरला आहे. हा कागद त्यांच्या भावाने पाळलेली दोन मांजरे कुरतडच असल्याचे अहमद शेख यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी भावाच्या मुलीला या मांजरांचा बंदोबस्त कर, असे सांगितले. याच कारणावरून दोन भावांमध्ये चांगलीच जुंपली. शेख यांना दांडक्याने रक्तबंबाळ होइपर्यंत मारहाण करण्यात आली. तर त्यांची पत्नी आणि मुलगा हा वाद सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.
दोन मांजरांमुळे शेख कुटुंबामध्ये झालेला वाद अखेर वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात पोहोचला. अहमद शेख यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शरप्पूउ शेख, साहील शेख, हिना शेख (सर्व रा. तळीये, ता. कोरेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला. तळीये परिसरात मात्र, सख्या भावांमध्ये मांजरांमुळे लागलेली कळवंड चर्चेचा विषय ठरली.