अकोला - मूर्तिजापूर कारंजा राज्य महामार्गावर दहातोंडा जवळ असलेल्या निर्माणाधीन पेट्रोल पंपावरुन साडेपाच लाखाचे ६ हजार लिटर डिझेल चोरी गेल्याची घटना रविवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान घडली.
ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दहातोंडा फाटा नजीक पेट्रोल पंपाचे बांधकाम सुरु आहे, बांधकाम सुरु आहे लवकरच डिझेल विक्री या पंपावरुन सुरु होणार होती, त्यासाठी टॅंकर मधून जमिनीखाली असलेल्या टाकीत डिझेल खाली करण्यात आले होते, मात्र डिझेल विक्री सुरु होण्यापूर्वीच १४ नोव्हेंबरच्या पहाटे ३ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी भुगर्भातील टाकीतून ५ लाख ४६ हजार ६६० रुपये किंमतीचे ६ हजार लिटरच्यावर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे या निर्माणाधीन पेट्रोल पंपावर दोन चौकीदारांची नेमणूक असून त्यांच्या उपस्थितीत जमिखाली असलेल्या साठवणूक टाकीतून एवढ्या मोठ्या प्रमाणात डिझेल चोरी होण्याची ही पहिलीच घटना असल्याची माहिती आहे. दोन चौकीदार असताना त्यांच्या तावडीतून डिझेल चोरी गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी कपील अशोक रामटेके राहणार अकोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीसांनी अज्ञात डिझेल चोरट्यांविरुध्द कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस करीत आहेत.