चंडीगड - पंजाबमधील जालंधर येथे आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप सिंह याची भर स्पर्धेदरम्यान हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणात पंजाब पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. पोलियांनी या प्रकरणी कॅनडामध्ये राहणाऱ्या स्नोवर ढिल्लोंसह तीन मुख्य आरोपींविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. इतर दोन आरोपी हे कॅनडा आणि मलेशिया येथील रहिवासी आहेत.
चौकशीदरम्यान, एका आरोपीने सांगितले की, स्नोवर ढिल्लोंने नॅशनल कबड्डी फेडरेशन ऑफ ओटारियोची स्थापना केली होती. तसेच विविध खेळाडूंना आपल्या फेडरेशनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र बहुताश प्रसिद्ध खेळाडू हे संदीपने चालवलेल्या मेजर लीग कबड्डीशी जोडले गेले होते. त्यामुळे स्नोवरचे फेडरेशन अयशस्वी ठरले.
१४ मार्च रोजी जालंधरमधील मल्लियाँ परिसरात कबड्डी स्पर्धेदरम्यान, आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू संदीप नंगल अंबिया याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तो एका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आला होता. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा घटनास्थळावर शेकडो लोक उपस्थित होते. दरम्यान, या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. समालोचकांनी माईकवरून उपस्थितांना जीव वाचवण्याचे आवाहन केले. यादरम्यान, अजून एका तरुणाला गोळी लागली.
गेल्या काही काळात पंजाबमध्ये माफियांचा प्रभाव वाढला असून, २०१९ मध्ये नॉर्थ इंडिया सर्कल स्टॉल कबड्डी फेडरेशनने राज्याच्या डीजीपींना याची माहिती दिली होती. कबड्डीमध्ये गँगस्टरांची एंट्री होत आहे, ही बाब खूप धोकादायक आहे, असे त्यांनी म्हटले होते.