- सदानंद नाईक
उल्हासनगर - कुशिवली धरण क्षेत्रासाठी भूसंपादन मोबदला घोटाळ्या प्रकरणी मंगळवारी चौथा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाला. मुळ वारस नाथा दुदा भाग्यवंत यांच्या नावाने बनावट कागदपत्राद्वारे अज्ञात इसमाने ६० लाख लाटून शासनाची व मुळ मालकाची फसवणूक केली असून आतापर्यंत सव्वा कोटींचा अपहार उघड झाला.
उल्हासनगर प्रांतकार्यालया अंतर्गत हाजीमलंग परिसरातील कुशिवली धरण क्षेत्रासाठी सन २०१९ पासून भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. एकून ८५.४० हेक्टर क्षेत्र जागा भूसंपादन करायची असून आजपर्यंत ५२.२४ हेक्टर क्षेत्र जागा भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली. तर एकून ५३ खातेधारकांना ११ कोटी ५१ लाखाचे मोबदला वाटप केले. मात्र मूळ व खऱ्या वारसाना मोबदला मिळण्या ऐवजी बनावट कागदपत्र द्वारे इतर जणांनी भूसंपादन मोबदला लाटल्याचा प्रकार उघड झाला. यामध्ये प्रांतकार्यालयाचा सेवानिवृत्त नायब तहसीलदाराचा सहभाग उघड झाला. मध्यवर्ती पोलिसांनी त्याला अटक केली. मंगळवारी याप्रकरणी चौथा गुन्हा दाखल झाल्याने, या घोटाळ्याची व्याप्ती वाढली आहे. चौथ्या गुन्ह्यात मूळ वारसदार नाथ दुदा भाग्यवंत याच्या नावाने अज्ञात इसमाने नाथ भाग्यवंत असल्याचे भासवून व बनावट कागदपत्रे बनवून ६० लाख ९ हजार ९०० रुपयांचा अपहार करून भाग्यवंत यांच्यासह शासनाची फसवणूक केली.
प्रांतअधिकारी जयराज कारभारी यांना ऑक्टोबर २०२१ साली भूसंपादन मोबदला सुनावणी वेळी मुळ वारसदारा बाबत संशय आल्याने, त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच ३० लाखाचे मोबदला वाटप थांबविले. याप्रकरणी १३ जनावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. असाच प्रकार यापूर्वी मोबदला वाटप वेळी झाला असावा, असा संशय येऊन गेल्या काही प्रकरणाची चौकशी केली असता, त्यांना धक्का बसला. त्यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यावर ११ मे, २१ मे व २४ मे २०२२ रोजी लागोपाठ तीन गुन्हे मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाले. मध्यवर्ती पोलिसांनी ७ ऑक्टोबर २०२१ गुन्ह्यात १३ जणांना तर ११ व २१ मे च्या गुन्ह्यात १२ असे २५ जणांना अटक केली असून यामध्ये प्रांत कार्यालयातील सेवानिवृत्त नायब तहसीलदार यांचा समावेश आहे. नायब तहसीलदार कंत्राटी पद्धतीने प्रांत कार्यालयात भूसंपादन प्रक्रिया बघत असल्याचे उघड झाले आहे.