नागपूर - लग्न करण्याची थाप मारून एका उच्चशिक्षीत तरुणीशी शरिरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या पुण्यातील एका तरुणावर सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गौरव जगनानी (वय २८) असे त्याचे नाव असून तो पुण्यात एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. तक्रार देणारी तरुणी (वय २८) उच्चभ्रू कुटुंबातील असून, तिचे एमकॉम झालेले आहे, ती खासगी नोकरी करते.
मेट्रीमोनियल साईटवर तिची आरोपी गौरवसोबत ओळख झाली. एकमेकांना पसंत केल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी लग्नाची बोलणी केली. सर्व काही पक्के झाल्यासारखे असताना गौरवने लग्नासाठी किती खर्च करणार, अशी विचारणा तरुणीच्या पालकांकडे केली. त्यांनी १५ ते २० लाख खर्च करण्याची तयारी दाखवली असता त्याने किमान ४० लाखांपर्यंत खर्च करण्याची अट घातली. त्यावरून त्यांच्या लग्नाची बोलणी फिस्कटली. दरम्यान, गौरवने तरुणीशी संपर्क करून ‘तुझ्याशीच लग्न करायचे आहे’ असे म्हणत नागपूर गाठले. तो सीताबर्डीच्या हॉटेल आदित्यमध्ये थांबला. १५ ते १८ सप्टेंबर २०२१ दरम्यान त्याने तरुणीला स्वताकडे बोलवून घेतले. एका धार्मिक ठिकाणी तिच्यासोबत लग्न लावले अन् परत येतो असे सांगून पुण्याला निघून गेला. तीन आठवडे झाले तरी तो परत आला नाही. त्यामुळे तरुणीने त्याच्यामागे सोबत घेऊन चलण्यासाठी तगादा लावला. मात्र, त्याने दाद दिली नाही. लग्नाची थाप मारून शरिरसंबंध प्रस्थापित केले आणि हुंड्यासाठी लग्न मोडल्याची भावना झाल्याने तरुणी सरळ सीताबर्डी ठाण्यात पोहचली. तिने नोंदविलेल्या तक्रारीवरून शनिवारी रात्री सीताबर्डी पोलिसांनी आरोपी गौरव जगनानीविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
पोलीस पथक पुण्याला जाणारतरुणीशी हॉटेलमध्ये दोन दिवस शरिरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या गाैरवने तिला सोबत नेले नाही. उलट पुण्याला गेल्यानंतर तिला एक नोटीस पाठवली. त्यात धाकदपट करून जबरदस्तीने लग्न लावून घेतल्याचा आरोप त्याने केल्याचे समजते. दरम्यान, आरोपी गाैरवला अटक करण्यासाठी सीताबर्डीचे पोलीस पथक पुण्याला जाणार असल्याची माहिती आहे.