नाशिक : गंगापूर रोड भागातील ७२ वर्षीय डॉक्टर महिलेस सायबर चोरट्यांनी तब्बल सव्वा अकरा लाख रुपयांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणात सायबर पोलीस ठाण्यात तीन सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडन येथून मौल्यवान गिफ्ट पाठविल्याचे सांगून पार्सलच्या खर्चापोटी विविध आमिषे दाखवत हा गंडा घालण्यात आला. डॉ. अरुणा अशोक वानखेडे (रा. रामेश्वर नगर, गंगापूर राोड, नाशिक) यांनी यासंदर्भात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.
विदेशात सेवाभावी वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून बोलत असल्याचे भासवून एका महिलेने वानखेडे यांच्यासोबत संपर्क साधत सोशल साईडवरून ओळख वाढविली. या काळात ९३१९६४५३४१ या क्रमांकावरून तिने संस्थेच्या कामकाजाची माहिती देत डॉक्टरला ०१५१२२०१००००६१४ या क्रमांकावर ३० हजारांची देणगीची रक्कम भरण्यास भाग पाडले. हा प्रकार गेल्या मे महिन्यात घडला. देणगी पदरात पडताच महिलेचा वरिष्ठ डॉ. अलेक्स याने डॉ. अरुणा अशोक वानखेडे यांना ४४७३८५३०४९५४ या क्रमांकावरून संपर्क साधून संस्थेस मदत करण्यासाठी आभार मानले.
लंडन येथून गिफ्ट पाठवित असल्याचे भासवून दोघांनीही डॉ. अरुणा यांना विविध आमिषे दाखवित तसेच वेळोवेळी संपर्क साधत कोटक महिंद्रा बँकेच्या खाते क्रमांक ९५४६५३६२२६ वर रोख रक्कम भरण्यास भाग पाडले. या घटनेत डॉ. अरुणा यांची ११ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक झाली असून, सायबरचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली प्रकरणाचा तपास करीत आहेत.