मुंबई - चाकूच्या धाकात ओला चालकाला लुटणाऱ्या चौकडीला शिवाजी नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापैकी दोन आरोपी हे अभिलेखावरील आरोपी असून पोलीस अधिक तपास करत आहे.
गोवंडी परिसरात राहणारे अजिज रजा मो.शरीफ अन्सारी (३८) हे ओला टॅक्सी चालक म्हणून काम करतात. १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास आरोपींनी ओला बुक करून शिवाजीनगर या ठिकाणी जाण्यास सागितले. त्यांना शिवाजी नगरच्या दिशेने घेऊन जात असताना आरोपींनी चाकूच्या धाकात त्यांच्याकडील पैसे, मोबाईल, ओला डिवाइस काढून घेत पळ काढला. अन्सारी यांनी तात्काळ शिवाजी नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीचा शोध सुरु केला.
पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील तपास अधिकारी काळे, दत्ता मालवेकर आणि अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. आरोपीना शिवाजी नगर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
असिफ वकील अहमद शेख (२२), समसुद्दीन शाबुद्दीन अंसारी, ऊर्फ शमशू (२३), मोहम्मद मोईन अब्दुल कादरी उर्फ बबलू (२२), तारीख तारीफ खान, उर्फ आजुभा (२३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी आसिफ विरोधात तीन तर, समसुद्दीन विरोधात एक गुन्हा यापूर्वी देखील दाखल आहे. चौघांकडे पोलीस कसून चौकशी करत असून त्यांनी आतापर्यंत किती चालकांना अशाप्रकारे लुटले आहे? याबाबत अधिक तपास करत आहे.