अलिबाग : मुंबईच्या विविध उपनगरांत वितरण करण्यासाठी आणलेल्या २१० किलो गांजासह एका व्यक्तीला खोपोली येथे एनसीबीच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून वाहनासह अटक केली. हा अटक करण्यात आलेला व्यक्ती मुंबईचा रहिवासी आहे. त्याच्याकडून हस्तगत केलेल्या गांजाची बाजारात ४ कोटी इतकी किंमत आहे.
आंध्र प्रदेश, ओडिशा राज्यांतून हा गांजा आणण्यात आला होता. गुरुवार, १ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आंध्र प्रदेश, ओडिशा येथून गांजा आणून त्याचे पुणे शहरात काही ठिकाणी वितरण केल्यानंतर गोवंडी, मुंबईमध्ये गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती गुप्तहेरांकडून मुंबई एनसीबी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने मुंबई - पुणे महामार्गावर मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर सापळा रचला होता. यावेळी पथकाने संशयित वाहनाचा पाठलाग केला. मात्र, पाठलाग होत असल्याचे पाहून आरोपींनी एनसीबीला चकवा देत खोपोलीकडे वाहन नेले.
पथकानेही चतुराई दाखवत फिल्मी स्टाईलने पाठलाग करून आरोपींना पकडले. या वाहनात ९८ पॅकेट्स सापडली. त्यात २१० किलो वजनाचा ४ कोटींचा गांजा होता. यात अटक केलेला आरोपी हा ४-५ वर्षांपासून अवैध अमली पदार्थांच्या तस्करी व्यवसायात आहे.