- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : अनेक पुरुषांसोबत समलैंगिक संबंध असतानाही लग्न करून पत्नीची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुचंद्रावेळी पतीचे हे बिंग फुटल्यानंतर पत्नीने पोलिसांकडे तक्रार केली. संबंधित तरुणाचा अटकपूर्व जामीन ठाणे न्यायालयाने फेटाळला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ऐरोली सेक्टर ९ येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाच्या कुटुंबीयांनी वधू-वर सूचक मंडळामार्फत एका उच्चशिक्षित तरुणीसोबत त्याचे लग्न जुळवले होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये दोघांचे लग्न झाले असता, ते मधुचंद्रासाठी हिमाचलला गेले होते. यावेळी त्याने वयस्कर व्यक्तीला सोबत घेतले होते. त्यावरून पत्नीला त्याच्या वागण्यावर संशय आला असता त्याने तिची समजूत काढली होती. परंतु त्यानंतरदेखील तो आपल्याऐवजी काही ठराविक मित्रांसोबतच अधिक जवळीक साधत असल्याचे पत्नीच्या निदर्शनास आले. यामुळे संधी साधून तिने त्याचा मोबाइल तपासला असता, त्यामध्ये पतीच्या समलैंगिकतेचे बिंग फुटले. पतीचे अनेक पुरुषांसोबत समलैंगिक संबंधाचे फोटो व व्हिडिओ मोबाइलमध्ये आढळले. ही बाब तिने घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने चाकूचा धाक दाखवत तिला गप्प राहण्याची धमकी दिली होती. अखेर तिने समलैंगिक असतानाही १८ लाख रुपये खर्च करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याची तक्रार रबाळे पोलिसांकडे दिली.
आरोपी तरुण फरारआरोपी तरुणाने अटक टाळण्यासाठी ठाणे सत्र न्यायालयातून अंतरिम जामीन मिळवला होता. मात्र त्याने केलेले कृत्य किती भयंकर आहे हे, पत्नीच्या वतीने वकील सागर कदम यांनी न्यायालयापुढे मांडले. त्यानुसार न्यायाधीश राजेश एस. गुप्ता यांनी त्याचा जामीन रद्द केला आहे. यामुळे त्याची अटक अटळ असल्याने त्याने पळ काढला असून, रबाळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.