उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक भूत पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलं होतं. भूत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अनेक गोष्टी घडवून आणत असे. पण आता भूत म्हणून वावरत असलेल्या या चोराला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी भूत पकडले असता धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने पोलिसांना सोन्या-चांदीच्या खजिन्यापर्यंत नेले. पोलिसांनी त्याच्याकडून 2.50 लाखांची रोख रक्कम आणि जवळपास 50 लाखांचे दागिने जप्त केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाबौली येथे राहणाऱ्या काम्या वाधवानी यांचं ब्युटी पार्लर आहे. काम्या यांच्या घरात चोरी झाली. 16 ऑक्टोबर रोजी काम्या कुटुंबासह बाहेर गेल्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते, त्याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. फुटेजमध्ये एक तरुण आणि महिला कैद झाली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चंद्रशेखर याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत भुताने अनेक चोरीच्या घटना घडवून आणल्याची बाब मान्य केली होती. डीसीपी प्रमोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखरला स्मॅकचे व्यसन आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले, त्या आधारे पथकाने चंद्रशेखरला अटक केली. त्याच्या सांगण्यावरून बहीण रेणूच्या घरातून सोन्या-चांदीचे बंडल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. यासोबतच स्मॅक पुड्याही सापडल्या आहेत.
चंद्रशेखरने पोलिसांना सांगितले की, मी दिवसा रेकी करायचो. यानंतर रात्रीच्या अंधारात चोरीच्या घटना घडवत असे. बहीण रेणूच्या घरी चोरीचा माल ठेवायचो. पोलिसांनी त्याच्या घरातून दोन हिऱ्याच्या अंगठ्या, 21 सोन्याच्या अंगठ्या, 21 ब्रेसलेट, 6 मंगळसूत्र, चार चेन, पाच जोड्या टॉप्स, तीन सोन्याचे लॉकेट, एक ब्रेसलेट असे मोठ्या प्रमाणात दागिने जप्त केले आहेत. दोन कानातले, सोन्याचे हेअर बँड, 9 सोन्याचे लॉकेट, 20 चांदीचे तुकडे, चांदीचे पैंजण, आणि चांदीची नाणी जप्त करण्यात आली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"