नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना या समोर येत आहेत. अशाच एका भयंकर घटनेबाबत आता मोठा खुलासा करण्यात आला आहे. 21 मे रोजी आग्रा येथे झालेल्या खळबळजनक प्रीती हत्याकांडात पोलिसांनी कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. या हत्याकांडानंतर पती उपेंद्र, त्याची प्रेयसी मोनिका आणि मैत्रीण पल्लवी जेलमध्ये आहेत. तिघेही प्रीतीच्या हत्येचे आरोपी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय प्रीतीचं लग्न 11 डिसेंबर 2021 रोजी झालं होतं. लग्नाच्या पाच महिन्यानंतरच अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. 21 मे रोजी घरात सर्वजण होते. एका खोलीत उपेंद्र पत्नी प्रीतीसोबत झोपला होता. 22 मेच्या सकाळी उपेंद्रच्या वडिलांनी पोलिसांना फोन करून बोलावलं. त्यांनी खोलीत पाहिलं तर प्रीती रक्ताळलेल्या अवस्थेत होती. खोलीत उपेंद्रसह दोन तरुणीही होत्या. पोलिसांनी उपेंद्रला घटनास्थळाहून अटक केली.
प्रीतीच्या माहेरच्यांनी या सर्व प्रकारानंतर उपेंद्र आणि कुटुंबीयांविरोधात हुंडा आणि त्यासाठी हत्या केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी उपेंद्रची चौकशी केली. यानंतर मोनिका आणि पल्लवीचं नाव समोर आलं. पल्लवीची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. तिला 50 हजार रुपयांचं आमिष दाखवण्यात आलं होतं. पत्नीला सोडून देईल, असं उपेंद्रने प्रेयसी मोनिकाला वचन दिलं होतं.
रागाच्या भरात मोनिका त्या दिवशी उपेंद्रच्या घरी आली होती. आपल्यासमोर पत्नीची हत्या करण्याचा दबावही आणला. यानंतर मोनिका आणि पल्लवीने प्रीतीचे हात-पाय पकडले. उपेंद्रने पत्नीवर चाकूने हल्ला केला. यादरम्यान तिचा आवाज येऊ नये म्हणून उशीने तोंडही दाबलं होतं. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.