रायपूर - छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधील आरंग भागात एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. फेब्रुवारीच्या ८ तारखेदरम्यान महिलेची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या महिलेच्या शैलेंद्र धीवर या मुलाने या प्रकरणाची तक्रार मंदिर हसौद पोलीस ठाण्यामध्ये केली होती. त्याने आपल्या तक्रारीमध्ये त्याने सांगितले की, त्याने त्याची आई भगवंतीन धीवर हिला ८ फेब्रुवारी संध्याकाळी ४.३० वाजता बस स्टँडवर सोडले होते. मात्र त्याची आरंग येथे जाणारी त्याची आई त्याचदरम्यान, ९ फेब्रुवारी रोजी एका महिलेचा मृतदेह मंदिर हसौद क्षेत्रातील जंगलात सापडला. त्यानंतर शैलेंद्रने त्याच्या आईच्या मृतदेहाची ओळख पटवली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात मंदिर हसौद पोलीस ठाण्यात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याचा तपास सुरू केला तेव्हा सदर महिला ही अखेरच्या वेळी संतूराम दिवान याच्यासोबत दिसली होती.
दरम्यान, पोलिसांनी संतु राम याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सुरुवातीला हात वर केले. तसेच तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच संतू राम याने आपला गुन्हा कबूल केला. तसेच मृत भगवंतीन धीवर हिची हत्या केल्याचे मान्य केले. तसेच हत्येमागचे कारणही सांगितले.
संतू राम याने सांगितले की, मृत भगवंतीन धीवर ही त्याला फसवण्याची धमकी देऊन सातत्याने ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत असे. त्यामुळे कंटाळून तिची हत्या केल्याचे आरोपी संतू राम याने सांगितले. त्याने मृत महिलेला मंदिर हसौदमधील बस स्टँडवरून दुचाकीवर बसवून जंगलात नेले. तिथे तिचा गळा स्कार्फने आवळून तिची हत्या केली. तसेच तो हत्या करून फरार झाला. दरम्यान, आरोपीला अटक करून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तसेच आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.