- नरेश डोंगरे नागपूर - गोंदिया जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या चुरडीतील (ता. तिरोडा) हत्यांकाडातील मारेकरी बाहेरचा की घरचा, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित केला आहे.एकाच कुटुंबातील रेवचंद तसेच मालता बिसेन हे दाम्पत्य आणि त्यांची पौर्णिमा आणि तेजस ही दोन मुले अशा चाैघांचे मृतदेह आढळून आल्यापासून गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अवजड वस्तूने प्रहार करून मालता, पौर्णिमा आणि तेजसची हत्या करण्यात आली. तर, रेवचंद यांच्या शरीरावर एकही जखम नाही. त्यांच्या कपड्यांवर मात्र रक्ताचे शिंतोडे आहे. या हत्याकांडाचे आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला तेथे नेले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपीचा छडा लावण्यासाठी आणलेले श्वान घरातच घुटमळले आणि नंतर ते रेवचंदच्या मृतदेहाकडे बघून भुंकू लागले.
डॉक्टरांनी चाैघांचा पोस्टमार्टम अहवाल देताना तिघांची गंभीर दुखापतीमुळे आणि रेवचंदची गळफास लावल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल दिला आहे. रेवचंदच्या शरीरावर कोणतीही जखम नाही. त्यामुळे आधी तिघांची हत्या करून नंतर रेवचंदने आत्महत्या केली की काय, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे. घरात झटापटीच्या कोणत्याही खुणा नाहीत. लुटमारीचेही कोणते निशाण नाही. त्यामुळे या हत्या करणारा आरोपी बाहेरचा की घरचाच, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या संबंधाने आम्ही सर्वकश चाैकशी करीत आहोत. त्यामुळे या घडीला काही निष्कर्ष काढता येणार नाही, असे गोंदियातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत आहेत.
गोंदिया पोलीस अधीक्षक म्हणतात....
घटनास्थळावरची एकूणच स्थिती, वैद्यकीय अहवाल आणि श्वानाने दिलेले संकेत लक्षात घेता मारेकरी बाहेरचा वाटत नाही. तरीसुद्धा आम्ही सर्व अँगल तपासत आहोत. ठोस निष्कर्षानंतरच आरोपीचे नाव जाहिर करू. - विश्व पानसरे, (पोलीस अधीक्षक, गोंदिया)