नवी दिल्ली - लग्न म्हटलं की गिफ्ट्स आलेच. नातेवाईक, मित्रमैत्रिणी लग्नाच्या शुभेच्छा देत गिफ्ट आवर्जून देतात. त्यानंतर जेव्हा वेळ असेल तेव्हा नातेवाईकांसह ही गिफ्ट्स उघडली जातात. पण हे करताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात आलेल्या एका गिफ्टचा अचानक स्फोट झाल्याने नवविवाहित तरुण गंभीर जखमी झाला आहे. गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अशाप्रकारे घटना घडल्याने हत्येचा कट असल्याचं देखील म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवसारी जिल्ह्यातील मीठांबरी गावात काही दिवसांपूर्वी एक लग्न झालं. लग्नानंतर नवरा-नवरी आपल्या घरामध्ये कुटुंबीयांसह बसून कोणी कोणी काय काय गिफ्ट्स दिलंय हे हौसेने पाहत होते. याच दरम्यान नवरदेवाने गिफ्टमध्ये आलेला एक टेडीबीअर उचलला. तितक्यात अचानक मोठा स्फोट झाला. यामध्ये नवरदेवासह घरामध्ये असलेला तीन वर्षीय चिमुकला गंभीर रित्या भाजला आहे.
स्फोटामुळे नवरदेवाचा एक डोळा पूर्ण खराब झाला आहे. तर हातालाही खूप दुखापत झाली आहे. या दोघांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. नातेवाईकांनी दिलेल्या मााहितीनुसार, सलमासोबत 12 मे रोजी लतेश गावित नावाच्या तरुणाचं लग्न झालं होतं. या जोडप्याला त्यांच्या लग्नात नातेवाईक आणि मित्रांनी भेटवस्तू दिल्या होत्या. मंगळवारी सकाळी गावित घरामध्ये कुटुंबातील इतर सदस्यांच्या उपस्थितीत भेटवस्तू उघडत होते.
गावित यांच्या हाताला, डोक्याला आणि डोळ्यांना जखमा झाल्या आहेत, 3 वर्षीय चिमुकल्याच्या डोक्याला आणि डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राजू पटेल याने हे गिफ्ट दिल्याचं गावित कुटुंबीयांना वधूच्या पालकांकडून समजलं. त्याचे वधूच्या मोठ्या बहिणीशी प्रेमसंबंध होते आणि ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानेच हे घडवून आणल्याचा संशय आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेतली असून पुढील तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.