नवी दिल्ली - गुजरातमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये काही कारणांवरून भांडण झालं आणि पुढे ते भांडण टोकाला गेलं. या भांडणातूनच संतापलेल्या पतीने अवघ्या काही मिनिटांत 2 वर्षांचं नातं संपवलं आहे. इन्स्टाग्रामवरून पतीने तिला ट्रिपल तलाक दिल्याची संतापजनक घटना आता समोर आली आहे. गुजरातमधील एका व्यक्तीने पत्नीला सोशल मीडिया पोस्टद्वारे ट्रिपल तलाक दिल्याचा आरोप पत्नीने केला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परस्परांमधील वादामुळे या महिलेला घरातून हाकलून देण्यात आलं, त्यानंतर ती आई-वडिलांसोबत राहत होती अशी महिती तिने दिली आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नोव्हेंबर 2019 मध्ये 27 वर्षीय महिलेचा विवाह महिसागर जिल्ह्यातील देबर गावातील एका व्यक्तीशी झाला होता. या दोघांमध्ये भांडण झाले आणि पतीने घरातून हाकलून दिल्यानंतर ही महिला तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गेल्या वर्षी जुलैमध्ये घरामध्ये झालेल्या भांडणानंतर ट्रिपल तलाक दिला होता. या महिलेला ट्रिपल तलाक कायद्याबाबत माहिती नसल्यानं तिने तक्रार दाखल केली नव्हती.
सब-इन्स्पेक्टर चेतन सिंह राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने यापूर्वी जुलैमध्ये तीन वेळा तलाक असं म्हटलं होतं. त्यावेळी या दोघांमध्ये भांडण झालं होतं आणि त्याने पीडितेला सासरच्यांनी घर सोडण्यास भाग पाडलं होतं. त्यावेळी या महिलेला तिहेरी तलाक विरोधातील कायद्याविषयी काहीच माहिती नव्हती आणि त्यामुळे तिने तक्रारही दाखल केली नाही, असं या महिलेनं आम्हाला सांगितलं. याआधी महिलेने पतीविरोधात छळाची तक्रार दाखल केली होती असं राठोड यांनी सांगितलं.
महिलेला तिच्या पतीच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहायच्या असल्यानं तिने वेगळ्या नावाने सोशल मीडिया अकाऊंट सुरू केलं. परंतु हे अकाऊंट पत्नीचं असल्याचं पतीला समजल्यानंतर त्याने पुन्हा सोशल मीडियावर ट्रिपल तलाक असं म्हटलं. त्यानंतर महिलेने याबाबतची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली आणि बुधवारी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असं सब-इन्स्पेक्टर चेतन सिंह राठोड यांनी म्हटलं आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.