नवी दिल्ली - गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ऐन दिवाळीत गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घरात घुसून एकाच कुटुंबातील सहा जणांवर आरोपींनी हल्ला केल्याची भयंकर घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अंतर्गत वादातून माजी सरपंचाच्या घरी हा प्रकार घडल्याची माहिती आहे. गोळीबारात 21 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला, तर पाच जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
गुरुग्राममधील मानेसर परिसरात कासन गावात रात्री जवळपास साडेआठ वाजता ही घटना घडली. माजी सरपंचाच्या कुटुंबाच्या घरी लक्ष्मीपूजन सुरू होतं. त्याच वेळी आरोपींनी त्यांच्या घरात घुसून अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. त्यापैकी एक गोळी कुटुंबातील पाळीव कुत्र्यालाही लागली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. या हल्ल्यात आठ वर्षांचा मुलगाही जखमी झाला आहे. त्याच्या हाताला गोळी लागली. रिंकू नावाच्या तरुणाने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
सूड उगवण्यासाठी रिंकूने माजी सरपंचाच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याची चर्चा
माजी सरपंचाच्या कुटुंबासोबत पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा दावा केला जात आहे. 2007 मध्ये होळीच्या दिवशी रिंकूच्या कुटुंबातील एका सदस्याची हत्या करण्यात आली होती. त्याचा सूड उगवण्यासाठी रिंकूने माजी सरपंचाच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याची चर्चा सुरू आहे. 21 वर्षांच्या विकास राघवला हल्ल्यात 15 ते 20 गोळ्या लागल्या. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. कुटुंबातील इतर पाच सदस्यांना प्रत्येकी दोन-तीन गोळ्या लागल्या आहेत.
जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर
पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जातं आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, 2007 मधील हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी रिंकूने या कुटुंबावर आतापर्यंत तीन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.