जळगाव : सहकारी महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी पहूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे याला एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
न्यायाधीश डी.एन. चामले यांनी गुरुवारी हा निकाल दिला. २ जून २०२१ रोजी पहूर ग्रामीण रुग्णालयात ही घटना घडली होती. या दिवशी पीडिता ही ड्युटीवर होती. त्याचवेळी डॉ. वानखेडे हा रात्री १२.३० वाजेच्या सुमारास रुग्णालयात आला व बायकोचा वाढदिवस असल्याने काही पदार्थ खाण्यासाठी आग्रह करीत होता. आरोपी दारूच्या नशेत असल्याने पीडितेने पार्सल घेऊन दार बंद केले. त्यानंतर थोड्या वेळेने पुन्हा आरोपीने तिला रात्री १ वाजेच्या सुमारास फोन करून व्हाट्सअँपवर यायला सांगितले. त्यानंतर आरोपी रात्रभर तिला दारू पिण्यासाठी आग्रह करीत होता.
या प्रकाराला कंटाळून पीडितेने पहूर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाकडून ॲड. कृतिका भट यांनी बाजू मांडली. पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. हवालदार मनोज बाविस्कर, राजेंद्र परदेशी यांनी मदत केली.