नवी दिल्ली - हरियाणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सने सोमवारी गाझियाबाद येथून तब्बल 30 वर्षांपासून हरियाणात फरार असलेल्या आणि 25 हजार रुपये बक्षीस असलेल्या गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपी ओमप्रकाश उर्फ पासा हा अभिनेता आहे. तो 2007 पासून भोजपुरी सिनेमांमध्ये काम करत आहे. टकराव, दबंग छोरा, झटका यासह जवळपास 28 चित्रपटांत त्याने आतापर्यंत काम केलं आहे. आरोपी पानिपत जिल्ह्यातील नारायणा गावचा रहिवासी आहे. ओमप्रकाश हा गाझियाबादच्या हरबन्स नगरमध्ये नाव बदलून बऱ्याच दिवसांपासून राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगार ओमप्रकाश उर्फ पाशा हा माजी सैनिक देखील आहे. त्याला 1988 मध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर नाव बदलून पासा गाझियाबादच्या हरबन्स नगरमध्ये राहत होता. हत्या आणि चोरीच्या विविध गुन्ह्यांमध्ये पोलीस त्याचा शोध घेत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे एसटीएफने त्याला गाझियाबादमधील हरबन्स नगर येथून अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, ओमप्रकाश उर्फ पासा हा लष्करात कॉन्स्टेबल होता. 1984 मध्ये लष्कराच्या सिग्नल कॉर्प्समधून गैरहजर राहिल्यानंतर त्याने गुन्हेगारीच्या विश्वात प्रवेश केला आणि 1986 पासून तो गुन्हे करू लागला. त्याची सेवा लष्कराने 1988 मध्ये संपुष्टात आणली होती. यानंतर 15 जानेवारी 1992 रोजी पासाने भिवानीच्या मुबारिकपूर येथील रहिवासी धरमसिंग याला लुटण्याच्या उद्देशाने भोसकले आणि पळून गेला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भिवानी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खून करून आरोपी फरार झाला होता. त्यानंतर तो गाझियाबादला गेला आणि तिथेच राहू लागला. तिथे त्याने आपलं नावही बदललं. पाशाने गाझियाबादमध्ये दुसरं लग्नही केलं. त्याला तीन मुलं आहेत. पोलिसांना याची माहिती मिळताच एसटीएफचे पथक तात्काळ गाझियाबादला पोहोचले आणि पकडून त्याला भिवानी सदर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीवर हरियाणातील सोनपत, पानिपत जिल्ह्यात कार आणि दुचाकी चोरीसह खुनाचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय राजस्थानमध्येही त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.