गाझियाबाद - उत्तर प्रदेमधील गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर परिसरातील सैंथली येथे एका व्यक्तीने प्रॉपर्टी हडप करण्यासाठी आपल्या भावासह एकूण पाच जणांची हत्या केली. (Crime News) सर्वप्रथम या व्यक्तीने भावाची हत्या केली. त्यानंतर त्याने वहिनीसोबत लग्न केले. त्यानंतर त्याने एक एक करून दोन पुतणे आणि दोन पुतण्यांचाही जीव घेतला. या कारस्थानाची सुरुवात त्याने २० वर्षांपूर्वी केली होती. दरम्यान, गाझियाबाद पोलिसांनी आता आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. (he killed five members of his family in 20 years for property, married his Sister-in-law )
एएसपी आकाश पटेल यांनी याबाबत सांगितले की, गाझियाबादमधील सैंथली येथील ब्रिजेश याचा एकुलता एक मुलगा रेश ८ ऑगस्ट रोजी घरातून अचानक गायब झाला. खूप शोध घेऊनही काही फायदा न झाल्याने वडिलांनी मुरादनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलान्स, पीडितांशी संवाद यांच्या आधारावर ब्रिजेशचा छोटा भाऊ लिलू याची भूमिका संशयास्पद असल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर अधिक तपास केला असता त्याच्याविरोधात सबळ पुरावे मिळाले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला.
आरोपी लिलू याने सांगितले की, त्याने त्याचा पुतण्या रेशू याची सुरेंद्र, विक्रांत आणि त्याचे भाचे मुकेश व राहुल यांच्यासोबत मिळून हत्या केली. तसेच त्याचा मृतदेह बुलंदशहरजवळ पहासू येथे कालव्यात सोडला. आरोपींपैकी सुरेंद्र हा यूपी पोलिसांमध्ये सब इन्स्पेक्टर होता. पोलिसांनी लिलू, सुरेंद्र आणि राहुल यांना अटक केली आहे. तर विक्रांत आणि मुकेश या फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैंथली येथील लिलूचे ब्रिजेश आणि सुधीर हे मोठे भाऊ होते. सुमारे २० वर्षांपूर्वी त्याने सुधीरची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह नदीत फेकला. त्यानंतर त्याने सुधीरच्या पत्नीसोबत विवाह केला.तसेच पायल आणि पारूल या पुतण्यांना जवळ केले. मात्र काही दिवसांतच त्याने पायलला विष देऊन ठार केले. तर त्यानंतर तीन वर्षांनी पारुलची हत्या करून तिचा मृतदेह कालव्यात फेकला. तसेच ती स्वत:च्या मर्जीने कुठेतरी गेल्याची अफवा पसरवली. त्यानंतर सुधीरची सर्व संपत्ती आपल्या ताब्यात घेऊन त्याने जमीन विकून प्रॉपर्टीचा धंदा सुरू केला.
काही दिवसांतच त्याच्याकडील सर्व संपत्ती संपल्यावर त्याची नजर दुसरा भाऊ ब्रिजेशच्या संपत्तीवर पडली. त्यातून सुमारे आठ वर्षांपूर्वी त्याने ब्रिजेशच्या मोठ्या मुलाचे अपहरण करून त्याने त्याची हत्या केली. तर आता संधी मिळताच रेश याची हत्या केली. आरोपीच्या कबुलीनुसार त्याचे पुढील लक्ष्य ब्रिजेश आणि त्याची पत्नी होते. मात्र तत्पूर्वीच लिलूचा भांडाफोड झाला. तो कुटुंबातील सदस्य असल्याने पोलिसांचाही त्याच्यावर संशय येत नव्हता.