लखनौ - उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये चार मुलांचा तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. एकाच वेळी चार मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत मुलांच्या नातेवाईकांनी आरोप केला की, कुणीतरी घरासमोर चॉकलेट फेकून गेला होता. हे चॉकलेट मुलांनी खाल्ली आणि त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, प्रशासनाचे अधिकारीही दाखल झाले आहेत.
ही धक्कादायक घटना कसया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिसईच्या लठऊर टोला येथे घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, अनुसूचित जमाती (लठऊर) शी संबंधित असलेल्या दोन कुटुंबातील चार मुलांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. कुटुंबीयांनी सांगितले की, चारही मुलांनी घराच्या बाहेर फेकलेली चॉकलेट खाल्ले होती. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
मृत मुलांच्या नातेवाईकांनी सांगितले की, सकाळी ७ वाजता घराचया दरवाजावर कुणीतरी चॉकलेट फेकली होती. ही चॉकलेट्स एका मुलीने उचलली. त्यानंतर चारही मुलांनी ती खाल्ली त्यामुळे चारही मुलांचा मृत्यू झाला. मृत मुलीच्या आईने सांगितले की, दारात पडलेले चॉकलेट मुलांनी वाटून खाल्ले त्यानंतर पाच मिनिटांनी मुले तडफडायला लागली. त्यांना तातडीने जिल्ह्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्यांच्या मृत्यू झाला. हे चॉकलेट दारात कुणी टाकले हे आम्हाला माहिती नाही, असेही तिने सांगितले.