लखनौ - उत्तर प्रदेशमधील झांशी येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या एका नर्सने इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर नर्स कौटुंबिक कारणांमुळे त्रस्त होती. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी मंगळवारी संध्याकाळी तिने आईला फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. तिला वाचवण्यासाठी तत्काळ पोलिसांना फोन करून सूचना देण्यात आली. तसेच कुटुंबीयांनीही घटनास्थळी धाव घेतली. जोपर्यंत पोलीस दरवाजा तोडून तिच्या रूममध्ये घुसले तोपर्यंत कंचन हिने स्वत:ला अनेक इंजेक्शन टोचून घेतले होते. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे बुधवारी तिचा मृत्यू झाला.
मेडिकल कॉलेजमध्ये नर्स म्हणून कार्यरत असणाऱ्या कंचन राजपूत हिचा विवाह प्रेमनगरमधील रहिवासी असलेल्या राजेश राजपूत याच्याशी सुमारे वर्षभरापूर्वी झाला होता. दोघेही प्रेमनगर येथे भाड्याच्या घरात राहायचे. मंगळवारी ड्युटी केल्यानंतर ती पतीला सांगून माहेरी गेली. संध्याकाळी कंचनची आई घरी नव्हती. कंचनने आईला फोन करून सांगितले की, ती खूप टेन्शनमध्ये आहे, तसेच आत्महत्या करण्यासाठी जात आहे. ही सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र कंचन बेशुद्ध पडली होती. तसेच तिच्याजवळ अनेक इंजेक्शन आणि ड्रिप पडले होते. तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी मृत कंचनचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला. मृत कंचनचे पती राजेश राजपूत यांनी सांगितले की, कंचन संध्याकाळी माहेरी जाणार असल्याचं सांगून घरातून बाहेर पडली होती. तिथे जाऊन तिने विषारी इंजेक्शन टोचून घेतलं.