मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात एका व्यक्तीसोबत धोका झाला आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या ब्लाईंड मर्डर प्रकरणाचा पोलिसांनी छ़डा लावला असून धाकट्या दीरासोबतच्या प्रेमसंबंधातून दुसऱ्या पत्नीनेच पतीचा काटा काढल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पत्नीची हैवानीयत देखील समोर आली आहे.
मृत व्यक्तीच्या दुसऱ्या पत्नीचे धाकट्या दीरावर मन बसले होते. परंतू, पती या संबंधांत आडवा येत होता. म्हणून पत्नीने प्रेमाने पतीला एके दिवशी समोसा चटणीतून प्रेमाने उंदराला मारायचे विष भरविले होते. यात त्याचा मृत्यू झाला होता. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने धारधार शस्त्राने त्याचा गळा चिरला आणि पोत्यात मृतदेह भरून एका खोलीतील भुश्याखाली गाडला होता. या साऱ्या प्रकरणात तिला दीरासह पाच जणांनी मदत केली होती.
पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून दोघे फरार आहेत. दोन दिवसांपूर्वी पोलिसांना एक जंगलात एक सांगाडा पडलेला असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी पुरावे गोळा केले तेव्हा त्यांना तो सांगाडा रामसुशील पालचा असल्याचे समजले. तो दीड वर्षांपूर्वी गायब झाला होता. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीली. मऊगंज पोलिसांनी उमरी गावात मोर्चा वळविला. संशयाची सुई त्याच्या दुसऱ्या पत्नीकडे वळली. पोलिसी खाक्या दाखविताच तिने सत्य सांगितले. छोट्या दीरासोबत प्रेमसंबंध होतेच, परंतू तिच्या माहेरचे आणि रामसुशीलच्या कुटुंबाचे जमिनीवरून जुने वादही होते.
गेल्या दीड वर्षांपासून रामसुशील घरी दिसत नव्हता. यामुळे त्याच्या दुसऱ्या पत्नीकडे शेजारचे कधी कधी चौकशी करत असत. यावेळी ती बाहेर काम करण्यासाठी गेला असल्याचे उत्तर देत असे. अनेकदा दीड महिना तर कधी 15 ते 20 दिवसांसाठी घराबाहेर असायचा. यामुळे शेजाऱ्यांना देखील तसा संशय आला नाही. काही दिवसांपूर्वीच तिने दीराच्या मदतीने पतीचा सांगाडा पोत्यातून बाहेर काढला आणि तो जंगलात नेऊन फेकला. त्यानंतर ती उत्तर प्रदेशमध्ये पळाली होती. पोलिसांनी तिला तेथून ताब्यात घेतले आहे.