नवी दिल्ली - पैशासाठी पती हैवान झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विम्याचे 1 कोटी हडपण्यासाठी पतीने पत्नीचा काटा काढला आहे. पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. विमा काढताना बहुतांश वेळा व्यक्ती आपल्या जोडीदाराचं नाव नॉमिनी म्हणून देतात पण आता पैशासाठी आपल्याच जोडीदाराचा जीव घेत असल्याच्या या घटनेने खळबळ उडाली आहे. अमेरिकेमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. टेक्सासमध्ये राहणारा क्रिस्टफर कॉलिन्स आणि त्याची पत्नी युआन हुआ लिआंग यांनी लाईफ इन्शुरन्स घेतला होता.
1.4 कोटी रुपयांचं संरक्षण असणारा हा विमा घेतल्यानंतर पती क्रिस्टफरच्या मनात पैशांचा मोह निर्माण झाला. पत्नीचा मृत्यू झाला तर पतीला 1 कोटी 40 लाख रुपये मिळण्याची हमी देणारी ही पॉलिसी होती. ही पॉलिसी काढल्यानंतर दोन दिवसातच युआनचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता तिच्या पत्नीनेच हत्या केल्याचा पोलिसांना संशय आला पण क्रिस्टफरने पोलिसांना चोरांनी हत्या केल्याचं वारंवार सांगितलं होतं.
पतीने स्वतःच पोलीस ठाण्यात केला फोन
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, घटनेच्या दिवशी पतीने स्वतःच पोलीस ठाण्यात फोन केला आणि आपल्या घरात काही चोर घुसल्याचं सांगितलं. आपण फोनवर त्यापैकी काही पुरुषांचा आवाज ऐकला असून आपल्या पत्नीला त्यापासून धोका असल्याचं त्यानं सांगितलं. पोलिसांनी तातडीनं आपल्या घरी जाऊन पत्नीची चोरांच्या तावडीतून सुटका करावी, अशी विनंती त्यानं पोलिसांना केली. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना युआन मृतावस्थेत पडल्याचं दिसून आलं. घरी पोहोचल्यानंतर पत्नीचा मृतदेह पाहून धक्का बसल्याचं नाटक करत त्याने आपल्या हातातील बॅग दूर फेकली आणि तिच्या मृतदेहापाशी जाऊन रडू लागला.
पैशासाठी पती झाला हैवान, पत्नीची निर्घृण हत्या; 'अशी' झाली पोलखोल
पतीचं वागणं पोलिसांना नाटकी आणि संशयास्पद वाटल्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीला गोळी मारून पतीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर घर बंद करून तो कार्यालयात गेला आणि पोलिसांना फोन करून हत्येचा बनाव रचला. चोरट्यांनी पत्नीची हत्या केल्याचं भासवून विम्याचे पैसे लाटण्याचा त्याचा डाव होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो फसला. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.