जयपूर - राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे एका पतीने पत्नीपासून सुटका करून घेण्यासाठी तिला आणि तिच्या गर्भात वाढत असलेल्या दोन मुलांना मारण्यासाठी भयानक कारस्थान रचले. पत्नी आणि तिच्या गर्भातील मुलांची हत्या करण्यासाठी या नराधमाने थेट डॉक्टरांनाच दोन लाख रुपयांची सुपारी दिली. त्याचे हे इरादे ऐकून डॉक्टरांनाही धक्का बसला. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले.डिलिव्हरीच्या ऑपरेशनदरम्यान गर्भवती पत्नी आणि तिच्या गर्भातील मुलांना मारण्याची ऑफर डॉक्टरांना दिली. मात्र डॉक्टरांनी त्याच्या इराद्यांवर पाणी फिरवले. सदर महिला ही आरोपीची तिसरी पत्नी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.
झालावाड येथील पोलीस अधिकारी बलबीर सिंह यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या सर्जरी विभागातील चिकित्सक अखिलेश मीणा यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, बुधवारी पिडावा येथील मंगल सिंह या तरुणाने त्यांना फोन केला. मंगल सिंहने सांगितले की, त्याची पत्नी गर्भवती आहे, तसेच तिच्या गर्भामध्ये जुळी मुले आहेत. तिला प्रसुतीसाठी तो झालावाड येथे आणू इच्छितो. ती दोन-चार दिवसांमध्ये प्रसुत होईल.
मात्र त्यानंतर तो जे काही बोलला ते डॉक्टरांसाठी धक्कादायक होते. या मंगल सिंहने पत्नीला प्रसुतीदरम्यान, ठार मारण्याची सुपारी डॉक्टरांना देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी दोन लाख रुपये देण्याचीही ऑफर दिली. त्यावर डॉक्टरांनी संतप्त होऊन त्याला खडेबोल सुनावले. तसेच पोलीस ठाण्यात जाऊन त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीला लवकरच अटक केली जाईल. या व्यक्तीची आधी दोन लग्ने झाली आहेत. मात्र नंतर त्याने तिला सोडून दिले. त्यानंतर सदर महिलेसोबत त्याने तिसरे लग्न केले. अशा परिस्थितीत तो तिची हत्या करू इच्छित होता. मात्र डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे त्याचा डाव फसला.