रायपूर - छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यातील हसौद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अमलीडीह गावात पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, मृत दाम्पत्याच्या मुलीने दिलेल्या जबाबामधून धक्कादायक कारण समोर आलं आहे.
याबाबतची सविस्त हकीकत अशी, येथे राहणाऱ्या मनोज बरेठ याचा विवाह १० वर्षांपूर्वी रमशीला हिच्याशी झाला होता. दोघांनाही एक सात वर्षांची मुलगी आहे. मनोज हा पत्नी रमशीला हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यावरून पती पत्नीमध्ये खूप वाद होत असत. २३ ऑगस्ट रोजी रात्री दोघांमध्ये या विषयावरून कडाक्याचं भांडण झालं. हा वाद एवढा वाढला की मनोजने संतापून आपल्या ७ वर्षांच्या मुलीसमोरच पत्नी रमशीला हिची धारदार हत्याराने वार करून हत्या केली.
त्यानंतर तो घरातून फरार झाला. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हत्येचा गुन्हा दाखल केला. तसेच मृत रमशीला हिच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. तसेच फरार मनोज याचा शोध सुरू केला. यादरम्यान, मनोज बरेठ याने पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केली असून, त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीमध्ये पडला असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जात मनोजचा मृतदेहही ताब्यात घेतला. त्यानंतर पंचनामा करून दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले. आता या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. दरम्यान जांगगीरचे एसपी विजय अग्रवाल यांनी सांगितले की, मनोज आणि रमशील यांच्या मुलीने जबाबात सांगितले की, घरात तिचे आई-वडील दररोज भांडण करायचे. ही घटना घडली त्या रात्रीही आई-वडलांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. आता पोलीस आसपास आणि ओळखीच्या लोकांकडे चौकशी करत आहेत. तसेच प्रत्येक बाजूने तपास करत आहेत.