नवी दिल्ली - छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुर्ग जिल्ह्यातील भिलाई परिसरात राहणाऱ्या पती-पत्नीने टोकाचं पाऊल उचललं आहे. पोलिसांना घटनास्थळी दोन वेगवेगळ्या सुसाईड नोट सापडल्याची माहिती मिळत आहे. दोघांनीही आपल्या सुसाईड नोटमध्ये आर्थिक परिस्थिती आणि मोठ्या भाऊ आणि वहिनीने त्रास दिल्यामुळे कंटाळल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी दोघांचाही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार यादव आणि त्यांची पत्नी सुनीता हे एका भाड्याच्या घरामध्ये राहत होते. आधी ते आई-वडिलांसोबत एकत्र राहायचे. पण नंतर मोठा भाऊ आणि वहिनीसोबत वाद होऊ लागले. यामुळे वडिलांनी त्यांना घरातून बाहेर काढलं होतं. यानंतर त्यादोघांनी एका भाड्याच्या घरामध्ये आपला संसार सुरू केला. लॉकडाऊनमध्ये सुशीलची नोकरी गेली. घरामध्ये पैसे नसल्याने पती-पत्नीतही वाद होऊ लागले. अचानक एक दिवस सकाळी खूप उशीर झाला तरी दोघांनी देखील घराचा दरवाजा उघडला नाही.
घर मालकाने दरवाजा उघडून पाहिलं असता हे दोघंही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांना तपासादरम्यान घरामध्ये सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये मोठा भाऊ आणि वहिणीमुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच दुसऱ्या एका नोटमध्ये आर्थिक परिस्थिती हे कारण दिलं आहे. मोठा भाऊ आणि वहिनीमुळे आमच्या कुटुंबात फूट पडली. आईवडील लांब गेले आणि त्यामुळेच पालकांनी आम्हाला घराबाहेर काढलं असं देखील सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.