नवी दिल्ली - हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वीजपुरवठा खंडित केल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने थेट अधिकाऱ्यावरच हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. त्याने अधिकाऱ्याच्या छातीवर लाथ मारली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हैदराबादच्या कारवान विभाग कार्यालयातील वीज विभागातील उप-अभियंते विजय कुमार यांना 22 वर्षीय स्थानिक रहिवाशाने छातीवर लाथ मारली.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा स्टेट साऊथर्न पॉवर डिस्ट्रिब्यूशन कंपनी लिमिटेडच्या कारवान उपकेंद्रात काम करणाऱ्या एका उप-अभियंत्यावर मंगळवारी हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकारी विजय कुमार, इतर व्यक्तींसह टप्पाचाबुत्रा येथील वेगवेगळ्या वसाहतींमध्ये गेले होते आणि वीज बिल न भरलेल्या घरांचा वीजपुरवठा खंडित केला होता. ते कार्यालयात परतल्यानंतर, विशाल आणि त्याच्या आईसह एक व्यक्ती कार्यालयात आली.
विजय कुमार यांनी त्यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित केल्याबद्दल त्याच्याशी वाद घातला. "वादादरम्यान विशालने अधिकाऱ्याच्या छातीवर लाथ मारून शिवीगाळ केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे" अशी माहिती टप्पाचाबुत्राचे निरीक्षक जी संतोष कुमार यांनी दिली आहे. पोलीस सध्या अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन करणाऱ्या इतरांची ओळख पटवत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.