ठाणे - ठाण्यामध्ये बेकायदेशीररित्या शस्त्रांची तस्करी करणाºया सोनू जगमेर सिंग (३४, रा.मोरना, मुझफ्फरनगर, उत्तरप्रदेश) याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी बुधवारी दिली. त्याच्याकडून ६० हजारांचे तीन गावठी रिव्हॉल्व्हर हस्तगत करण्यात आली आहेत.
ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये अवैध शस्त्रास्त्रांसंबंधी कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी अलिकडेच दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी यासंबंधी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी तीन वेगवेगळी पथके तयारी केली होती. सहायक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांचे पथक ३० मे रोजी गस्तीवर असतांना बेकायदेशीररित्या शस्त्रांच्या तस्करीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्याच माहितीच्या आधारे माजिवडा सेवा रस्त्यावर सापळा लावून सोनू सिंग याला पिंपळे यांच्यासह पोलीस हवालदार विजय नाईक, संजय वालझाडे, निखील जाधव, अभिजित कलगुटकर, राजीव जाधव, चंद्रभान शिंदे, राजेंद्र पारधी आणि शंकर राठोड आदींच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन गावठी कट्टे जपत केली असून त्याने ही शस्त्रे कोणाकडून आणली होती? याचाही तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.