- अझहर शेखनाशिक : पूर्व वैमनस्यातून दिंडोरीरोडवर रवी महादू शिंदे उर्फ रवी सलीम उर्फ पिंटू सय्यद (२०) या युवकावर रिक्षातून आलेल्या संशयिताने धारदार शस्त्राने वार करुन ठार मारल्याची घटना शनिवारी (दि.१०) रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली होती. यानंतर पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. गुन्हे शोध पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास संशयित हल्लेखोराला अंबड भागातून ताब्यात घेतले. किरण रमेश कोकाटे असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे.
शनिवारी रात्री मायको दवाखान्याच्या पाठीमागे असलेल्या कालिकानगर येथून रवी सय्यद हा पायी घराकडे जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या एका रिक्षातून संशयित किरण खाली उतरला व त्याने हातातील धारदार चॉपरने रवीच्या कमरेजवळ वार केले. यामुळे रवी रक्ताच्या थारोळ्यात गल्लीत कोसळला. त्याला तातडीने रहिवाशांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयित किरण व त्याचा साथीदार घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षातून फरार झाले होते. घटनेची माहिती मिळताच विशेष पोलीस महानिरिक्षक तथा अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.बी.जी.शेखर पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड, अमोल तांबे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी त्वरित पंचवटी, म्हसरुळ, आडगाव पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना सुचना देत संशयिताच्या शोधार्थ पथके रवाना केली. तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकालाही समांतर तपास करण्याचे आदेश दिले.
पंचवटीच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक व मानवी कौशल्याचा वापर करून संशयित कोकाटे याला अवघ्या तीन तासांत बेड्या ठोकल्या. त्याच्याविरुद्ध मयत रवी याचे नातेवाईक युसुफ अमीर सय्यद (३३) यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा पंचवटी पोलीस ठण्यात दाखल करण्यात आला आहे. त्याचा दुसरा साथीदार हा फरार असून त्याचा व गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षाचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सिताराम कोल्हे यांनी सांगितले. त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यास यश येईल, असे ते म्हणाले.
संशयित आरोपीने प्रेयसीला भेटण्यासाठी धमकावले होते. कदाचित त्याच कारणावरून संशयित किरण याने प्रेयसीच्या भाऊ रवी याचा खून केला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रणजित नलवडे हे करीत आहेत.