रवींद्र देशमुख
सोलापूर - वाळू व्यवसायातील पैसे विचारण्यासाठी गेलेल्या आनंदराव विलास पाटील ( वय ४४, रा. रमाबाई आंबेडकर कॉलनी, लक्ष्मी निवास, पुणे ) यांना तिघांनी मिळून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी या सर्वांवर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी आनंदराव पाटील, आपले वाळू टेंडरच्या व्यवहारातील राहिलेले पैसे मागण्यासाठी आरोपी काडगावकर यांच्या घराकडे जात असताना आरोपी सुरेश काडगावकर, सुरेखा काडगावकर, अप्पाशा उमदी ( तिघे रा. हत्तूर वस्ती ) हे परिसरातील मंडईतून जात असल्याचे फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना दिसले. यावेळी आनंदराव यांनी तुम्ही अजून किती दिवस आमचे पैसे देणार नाहीत? आम्ही सर्वजण तुमच्या घरी चाललो आहेत, असे म्हणाले. त्यावेळी सुरेश यांनी आनंदराव यांना माझ्या घराकडे यायचे नाही. तुमची लायकी नाही, तुम्ही जर माझ्याकडे घराकडे आलात तर हात पाय तोडून टाकेन, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली.
सुरेखा हिने फिर्यादी व इतरांना जातीवादी शिवीगाळ करत सर्वांना चप्पल मारते, असे म्हणत अपमानित केले. अप्पाशा याने स्वतःजवळची रिव्हॉल्वर काढून ठार मारण्याची धमकी दिली. या आशयाची तक्रार आनंदराव पाटील यांनी दिली आहे. या तक्रारीवरून वरील तिघांवर अनुसूचित जाती जमाती कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त माधव रेड्डी हे करत आहेत.