नवी दिल्ली - आयकर विभागाने कानपूरच्या एका व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला आहे. यामध्ये तब्बल 50 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. शिशिर अवस्थी असं या व्यापाऱ्याचं नाव असून त्याच्याकडे लाखो रुपयांचं घबाड सापडलं आहे. नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच झोप उडाली. आयकर विभागाच्या पाच विशेष टीमने कानपूर आणि उन्नावमधील पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 50 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
स्वरूप नगर परिसरातील घर, नया गंज येथील गोदाम, उन्नावमधील फॅक्ट्री आणि दोन अन्य ठिकाणी टीम तपास करत आहे. आयकर विभागाची एक टीम शिशिर अवस्थी आणि त्याच्या अकाऊंटंटची चौकशी करत आहे. शिशिर उपमन्यु ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मालक आहे. तसेच त्याचे दोन लॉकर असल्याची देखील माहिती मिळाली आहे. कर चुकवेगिरीची शंका आल्याने हा छापा टाकण्यात आला आहे. याशिवाय एक टीम उन्नाव औद्योगिक परिसरात असलेल्या कारखान्यातही पोहोचली. प्राथमिक तपासात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे.
कागदपत्र, हार्डडिस्क, संगणक जप्त
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून अंडर बिलिंग केले जात होते. फेक इनवॉइस तयार केले जात होते. कॅश बुकमध्ये त्रुटी असल्याचे सांगण्यात आले. स्टॉक आणि रजिस्टरमध्ये खूप फरक आहे. त्याची कमाई जास्त होती, पण रिटर्न कमी भरले जात होते. टीमने मोठ्या प्रमाणावर कागदपत्र, हार्डडिस्क, संगणक जप्त केले आहेत. आयकर विभागाने फेब्रुवारीमध्ये कानपूरचे लोकप्रिय ज्वेलर राजेंद्र अग्रवाल यांच्या अनेक ठिकाणांवर छापा टाकला होता. यामध्ये जवळपास 4.5 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.