नवी दिल्ली - बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाला मोबाईलची चोरी केल्याच्या आरोपावरून जमावाने त्याला मारहाण करत विजेचा शॉक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचा मोबाईल चोरला असा आरोप मुलावर करण्यात आला. त्यानंतर जमावाने या मुलाला पकडून गाडीला बांधलं आणि मारहाण केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या मुझफ्फरपूरमधील मोतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साढा गावात ही भयंकर घटना घडली आहे. एका व्यक्तीचा मोबाईल चोरीला गेला. तेव्हा हा मोबाईल अल्पवयीन मुलानेच चोरला असल्याचा संशय काहीजणांना आला. सत्य समजून घेण्याआधीच तिथे लोक जमा झाले आणि जमावाने अल्पवयीन मुलावर चोरीचा आळ घेतला. मुलाला अगोदर गाडीला बांधले आणि मारहाण केली. त्यानंतर या मुलाला वीजेचा शॉक देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
मुलाच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केली तक्रार
जमावाच्या तावडीतून त्यांनी मुलाला सोडवलं आणि उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं. या प्रकारामुळे हा मुलगा खूप घाबरला होता आणि त्याला अनेक जखमा झाल्या होत्या. या मुलावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या पालकांकडे सोपवलं आहे. आपल्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी या मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे जमावातील नागरिकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच दोषींवर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भयंकर! गळ्यात टायर बांधला अन्…; घरातून पळून जाणाऱ्या तरुण-तरुणीसोबत गैरवर्तन; Video व्हायरल
मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली. एक तरुणी, तिच्यासोबत पळून जाणारा तरुण आणि यासाठी मदत करणारी मुलीची अल्पवयीन बहीण या तिघांसोबत गैरवर्तन करण्यात आलं आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी या तिघांच्याही गळ्यात टायर लटकवले आणि लोकांसमोर गाण्यावर नाचण्यास त्यांना भाग पाडलं. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. धार जिल्ह्यातील गंधवानी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार नोंद करण्यात आली आहे. 14 वर्षीय मुलीने तक्रार दाखल केली आहे. 19 वर्षीय मुलीचे वडील, तिचा भाऊ आणि नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.