- नितीन गव्हाळेअकोला : पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील विशेष पथकाने मोबाइलधारकांचे हरविलेले, चोरीस गेलेल्या सहा लाख रुपये किमतीच्या ३६ मोबाइलचा शोध घेतला असून, हे मोबाइल बुधवारी सकाळी मूळ मालकांना परत देण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.
जिल्हांतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये अभिलेखावर नोंद असलेले गहाळ मोबाइल शोधकामी पाेलीस कर्मचारी शेख अयाज, उमेश सुगंधी, नीलेश खंडारे, रवी खंडारे यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले असून, सदर पथकामार्फत अभिलेखावरील गहाळ असलेल्या मोबाइलचा शोध घेण्यात आला. या पथकाने १ ते २७ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत हरवलेल्या, चोरी गेलेल्या ३६ मोबाइलचा शोध लावला असून, हे मोबाइल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. सर्व मोबाइल हे संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये पुढील कार्यवास्तव सोपविण्यात आले आहेत. तसेच अकोला जिल्हांतर्गत पोलीस ठाण्यांमधील अभिलेखावर नोंद असलेल्या गहाळ मोबाइलचा शोध घेणे सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, शेख अयाज, उमेश सुगंधी, नीलेश खंडारे, रवी खंडारे, सायबर पोलीस स्टेशन येथील कुंदन खराबे यांनी केली आहे.