नवी दिल्ली - बिहारमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. अनेकांची संपत्तीही जप्त झाली आहे, काहींवर कारवाई करत त्यांना तुरुंगात पाठवलं जात आहे. पण तरी देखील लाचखोरीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता बिहारच्या जुमईमध्ये घडली आहे. पंचायत स्तरावर ग्रामस्थांना न्याय देण्यासाठी गावात न्यायालयाची स्थापना करण्यात आली. मात्र आता तेथून लाचखोरीचे प्रकरण समोर आलं आहे. अर्जावर सही करण्यासाठी अवघ्या दोनशे रुपयांची लाच मागण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जमुई जिल्ह्यातील लक्ष्मीपूर ब्लॉकमध्ये एका महिला कर्मचाऱ्याने लाच मागितली आहे. गौरा पंचायतीच्या न्यायालयाच्या न्याय सचिव अनुराधा कुमारी यांनी लाच मागितल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये न्यायालयाच्या सचिव कागदावर सही करण्यासाठी दोनशे रुपयांची लाच मागत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण वंशावळ काढण्यासाठी गावच्या सचिवाकडे गेला, त्यावेळी त्याच्याकडे दोनशे रुपये मागितले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे की, ग्राम न्यायालयाची सचिव असलेली महिला लाच कुठे घेतली जात नाही? असा सवाल विचारत आहे. तसेच सचिव यंत्रणेवर लाचखोरीचा आरोपही करत आहेत. या व्हिडीओमध्ये तो तरुण असेही म्हणत आहे की, तुम्हाला मानधन मिळतं, मग लाच कशाला हवी? हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डीडीसी शशी शेखर चौधरी यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे, चौकशीनंतर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.