नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; खोलीत कोब्रा सोडून केली पत्नीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 03:58 PM2021-10-11T15:58:20+5:302021-10-11T16:09:08+5:30
Crime News : एका व्यक्तीने सर्पदंश करुन पत्नीची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
नवी दिल्ली - महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. केरळमध्ये एका व्यक्तीने सर्पदंश करुन पत्नीची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली. याप्रकरणी पती आता दोषी आढळला आहे. सूरज असं या आरोपीचं नाव असून त्याने आपली पत्नी उथराची हुंड्यासाठी छळ करुन हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या कोल्लममध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
7 मे 2020 रोजी उथरा घरामध्ये झोपलेली असताना तिला कोब्रा चावला. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. यानंतर उथराच्या माहेरच्या मंडळींनी तिचा पती सूरजवर तिच्या हत्येचा आरोप केला होता. सूरजने पत्नीच्या खोलीत मुद्दाम कोब्रा सोडला होता, जेणेकरुन तो चावल्यामुळे तिचा मृत्यू होईल. हा संपूर्ण कट रचण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीला झोपेच्या गोळ्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तपासात असेही समोर आले आहे की गेल्या वर्षीही त्याने सूरजने पत्नीची हत्या करण्याच्या उद्देशाने घरात कोब्रा सोडला होता.
उथराचा काटा काढण्याचा मोठा कट
तपासामध्ये सूरजने दोन वेळा साप पकडणाऱ्याला पैसे देऊन साप खरेदी केल्याचं समोर आलं आहे. त्याने याआधीही सर्पदंशाने पत्नी उथराचा काटा काढण्याचा मोठा कट रचला होता. मात्र त्यामध्ये तो यशस्वी झाला नाही अशी माहिती समोर आली आहे. सूरजवर पत्नीच्या हत्येसोबतच घरगुती हिंसाचारासह अनेक आरोप लावण्यात आले आहेत. य़ाप्रकरणी कोर्टाने त्याला दोषी ठरवलं असून 13 ऑक्टोबर शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या सर्व गोष्टींमागे पैसा हेच कारण असल्याचं समोर आलं आहे.
हुंड्यासाठी पत्नीचा छळ करायचा
सूरजला लग्नामध्ये भरपूर हुंडा देण्यात आला होता. यामध्ये रोख रक्कम, नवीन कार आणि सोन्याचे दागिने यासह अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. मात्र तरी देखील तो समाधानी नव्हता. तो सतत पैसे मागत असे. हुंड्यासाठी पत्नीचा छळ करायचा असा आरोप उथराच्या कुटुंबीयांनी केला आहे. उथराच्या मृत्यूवरुन तिच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या संशयाच्या आधारे सूरजला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने याता आपला गुन्हा कबूल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.