गुरुग्राम - हरियाणामधील गुरुग्राम येथे एका १३ वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान, या मुलीचं अपहरण करून तिला कारमधून नेत असलेल्या तरुणाचा कुटुंबीयांनी शर्थीने पाठलाग केला. या मुलीचे वडील आणि काकांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्याची बेदम धुलाई करत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
अपहृत मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री सुमारे १० वाजता ही घटना घडली. ही १३ वर्षीय मुलगी घराबाहेर पाणी आणण्यासाठी गेली असताना तिचे अपहरण करण्यात आले. ही घटना घडली तेव्हा घरातील इतर मंडळी टीव्ही बघत होते.
पोलिसांनी सांगितले की, हा तरुण कारमधून आला आणि मुलीच्या घराबाहेर थांबला. त्यानंतर तो या मुलीसोबत बोलू लागला. त्यानंतर अचानक या मुलीला कारमध्ये बसवून पसार झाला. ही माहिती शेजाऱ्या पाजाऱ्यांनी मुलीच्या वडील काकाला दिली. गडबडीत ते दोघेही दुचाकी घेऊन पाठलाग करू लागले. या दोघांना दुचाकीवरून कारचा पाठलाग करताना पाहून आरोपी घाबरला. तसेच मुलगी आणि कार तिथेच टाकून पळाला.
मात्र त्यानंतरही मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीचा पाठलाग सोडला नाही. अखेर दोन तासांनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीला हुडकून काढले. त्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. आता रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी भोंडसी पोलीस ठाण्यात कलम ३६३ अन्वये अपहरणाची तक्रार दिली आहे. आता आरोपीला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.